विषारी औषध घेतलेल्या वयोवृध्दाचा मृत्यू
धरणगाव : तालुक्यातील अंजनविहीरे येथे विषारी औषध सेवन केल्याने वयोवृद्धाचे उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत धरणगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. जगन्नाथ किशन चव्हाण (69, रा.अंजनविहिरे, ता.धरणगाव) असे मयताचे नाव आहे.
विषारी औषध प्राशनाने मृत्यू
बुधवार, 27 एप्रिल रोजी ते मुलगा नामदेव यांच्यासह शेतात गेले होते. शेतात काम करत असताना त्यांनी अचानक दुपारी पिक फवारणीचे विषारी औषध सेवन केले. त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांचा मुलगा नामदेव चव्हाण याने तातडीने खाजगी वाहनाने धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. विषारी औषध घेण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी धरणगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस नाईक मोतीपराग पवार करीत आहे.
