कृषि पंपांना सुरळीत वीजपुरवठा करावा : अमोल जावळे
यावल : 220 के.व्हीच्या विरोदा अतिउच्च दाबाच्या वीजकेंद्रातून 33 के.व्ही. लाईन काढून त्या परिसरातील 33/11 केव्ही क्षमतेच्या उपकेंद्रांना जोडण्यात आलेल्या नाही. त्यामुळे सदर परिसरातील शेतकर्यांना कमी दाबाचा व वेळोवेळी खंडित होणारा विद्युत पुरवठा होत आहे. यामुळे शेतकर्यांचे अतिउष्णतेमुळे अतोनात नुकसान होत असून आर्थिक संकटांना त्यांना सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात कृषिमित्र हरिभाऊ जावळे विचार मंचास शेतकर्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने 220 के.व्ही. विरोदा वीज केंद्रातून यावल, रावेर तालुक्याच्या परिसरातील 33 केव्ही उपकेंद्रांना वीज पुरवठा उच्च दाबाने करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत, व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी आणि विभागातील सर्व अधिकार्यांना कृषिमित्र हरिभाऊ जावळे विचार मंचतर्फे अमोल जावळे यांनी केली आहे.
माजी खासदार स्व.हरीभाऊ जावळेंची दृरदृष्टी
माजी खासदार तथा आमदार कृषी मित्र स्व.हरिभाऊ जावळे यांच्या माध्यमातून सावदा विभागातील यावल, रावेर शेतकर्यांच्या हितासाठी व त्यांना योग्य दाबाचा व खंडित वीज पुरवठा होऊन यांच्या शेतीचा विकास घडवून आणण्यासाठी, तसेच सोबत सदर भागात उद्योजकांना सुद्धा चालना मिळून नवीन उद्योग यावे व सोबत घरगुती ग्राहकांना सुद्धा योग्य दाबाचा वीजपुरवठा मिळण्यासाठी त्यांनी त्यांच्या कार्यकाळात लोड सेंटर बाबत सखोल अभ्यास करून महापारेषण कंपनी मार्फत अतिउच्च दाबाच्या 220 केव्ही क्षमतेचे वीज उपकेंद्र विरोदा येथे उभारणीसाठी पुढाकार घेतला होता. जागा मिळवून देऊन आवश्यक गोष्टींचा पाठपुरावा स्व.हरीभाऊ जावळेंनी केला होता. त्यासाठी त्याच वेळेस सदर 220 केव्ही वीज केंद्रातून आवश्यक पावर ट्रान्सफार्मर 220 के.व्ही. ते 33 के.व्ही. असे बसवून त्यापासून सावदा विभागांतर्गत येत असलेल्या विविध 33/11 केव्ही उपकेंद्रांना वीजपुरवठा देण्याबाबत योजना आखण्यात आलेली होती. त्यासाठी लागणारी जमीन सुद्धा महापारेषण कंपनीला अधिग्रहीत करून देण्यात आलेली होती.
विद्युत पुरवठा करण्याची मागणी
हे उपकेंद्र उभारण्याच्या वेळीच करण्यात आलेला विचार म्हणजे यावल रावेर तालुक्यातील परीसरामध्ये पूर्ण दाबाने कृषि पंपांना आणि उद्योगधंद्यांना विज पुरवठा होवून त्यांना चालना मिळण्यास मदत होणे हा उद्देश अद्याप सफल होऊ शकलेला नाही. 220 केव्ही उपकेंद्र ज्याची सध्याची क्षमता 400 एमव्हिए आहे, त्यातून आवश्यक व निकडीच्या त्या 33 केव्ही लाईन लवकरात लवकर काढण्यात येऊन यावल रावेर तालुक्यातील तीस केव्ही उपकेंद्रांना त्यांचा विद्युत पुरवठा करण्यात यावा अशा प्रकारची मागणी अमोल जावळे यांनी केली आहे.







