वाहन वेग मर्यादेचे फलक नसताना वाहन धारकांची लूट कुणाच्या आदेशाने ?

आमदार चंद्रकांत पाटील यांचा पोलिस अधिकार्‍यांना महामार्गावर खडा सवाल


मुक्ताईनगर : राष्ट्रीय महामार्गावर वाहन वेग मर्यादेचे फलक नसताना वाहन धारकांना ऑनलाईन पद्धत्तीने पाठवण्यात येणार्‍या मेमोद्वारे वाहन धारकांची लूट सुरू असल्याच प्रकार मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांना शनिवार, 21 रोजी लक्षात येताच त्यांनी पोलिस अधिकार्‍याची चांगलीच झाडाझडती घेतली. याप्रसंगी त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्याशी संपर्क साधून हा प्रकार तातडीने थांबवण्याची मागणी केली. वाहनधारकांना पाठवण्यात आलेला दंड तातडीने रद्द करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

वाहनधारकांची लूट कुणाच्या सांगण्यावरून ?
शनिवारी आमदार चंद्रकात पाटील हे मतदारसंघातील विवाह सोहळे व विविध कार्यक्रमांना भेटी देण्यासाठी निघाले असताना त्यांना राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वरील मुक्ताईनगर ते जळगाव दरम्यानच्या रस्त्यावर असलेल्या बोहर्डा-बोहर्डी गावाजवळ कॅमेराव्दारे वाहनांचे गतीची नोंद असलेले फोटो कॅप्चर करुन वाहन धारकांना ऑनलाईन दंड आकारला जात असल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे जिल्हा पोलिस विभागाच्या वाहतूक शाखेच्या वाहनातून दुर्बीणव्दारे वाहनांच्या गतीची नोंद असलेले फोटो काढून तसेच महामार्गावर कुठल्याही प्रकारचे वेग मर्यादेचे सूचना असलेले फलक लावण्यात आले नसताना हा भोंगळ प्रकार सुरू असल्याचे दिसताच आमदारांनी अधिकार्‍यांची चांगलीच झपाई केली. जिथे तुम्ही कर्तव्य बजावित आहात या ठिकाणी वाहन वेग मर्यादेच्या सूचना फलक कुठे आहे ? असा प्रश्न उपस्थित करीत ही कसली मनमानी करीत आहात, वाहन धारकांची लूट कोणाच्या आदेशावरून करीत आहात ? असा खडा सवाल आमदारांनी विचारला. या बाबतीत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून त्यांनी चर्चा केली. वाहन धारकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी वेग मर्यादेच्या सूचना फलक लावण्यात याव्या व तत्काळ वाहनधारकांना केलेले दंड रद्द करण्यात यावे अशा सूचना त्यांनी यावेळी बोलतांना केल्या.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !