शनिवार संकटवार : भुसावळकर खंडित वीजपुरवठ्याने संतप्त
भुसावळ : शहराचे तापमान आधीच 45 अंशावर पोहोचले असतानाच शनिवार, 21 रोजी दिवसभर विजेचा शहरातील सर्वच भागात लपंडाव सुरू असल्याने भुसावळकर घामाच्या धारांनी चिंब भिजल्याचे चित्र शहरात दिसून आले. वीज कंपनीच्या कारभारामुळे वीज ग्राहकांची चांगलाच संताप व्यक्त केला तर दिवसभरात तब्बल 15 ते 20 वेळा विजेची जा-ये सुरूच असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. महावितरणने अद्यापही मान्सूनपूर्व कामांची निविदा प्रक्रिया न केल्याने शहरातील अनेक फिडर ब्रेकडाऊन होत असल्याचे दिसून आले. शनिवारी दिवसभरात सहा ठिकाणी वीज तारा तुटताच वीजपुरवठा खंडित झाला.
दिवसभर वीजपुरवठा खंडित
उत्तर भागात न्यायालय फिडरवर न्यायालयाच्या मागील भागात दोन ठिकाणी, रेल्वे हॉस्पीटल मागील तापी खोरे भाग, वेडीमाता मंदिर, काशीराम नगर परीसर अशा चार ठिकाणी तर दक्षिण भागात टिंबर मार्केट फिडरवर दोन ठिकाणी वीज तारा तुटल्या. यासह दिवसभरात वारंवार ट्रिपींगमुळे वीजपुरवठा 18 वेळा खंडीत झाला. टिंबर मार्केट फिडरवरील छत्रपती शिवाजी महाराज संकूल भागासह अन्य भागात दोन तास तर न्यायालय फिडरवर सकाळी तीन तास व दुपारी अडीच तास वीजपुरवठा खंडीत झाल्याने वीज ग्राहकांनी चांगलीाच संताप व्यक्त केला.







