पारोळा-एरंडोल महामार्गावर कंटेनरच्या धडकेत जळगावचे दाम्पत्य ठार
खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात अपघात : अपघातानंतरही सार्वजनिक बांधकाम विभाग सुस्त
जळगाव : पारोळा-एरंडोल महामार्गावरील हिरापूर फाट्याजवळ खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीला कंटेनरने धडक दिल्याने जळगावच्या शिरसोलीतील दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीवरील मधुकर महारू पाटील (45, जळगाव) व त्यांच्या पत्नी गोडबाई मधुकर पाटील (40, जळगाव) या जागीच ठार झाल्या. अपघातानंतर कंटेनरचालक वाहन सोडून पसार झाला.
खड्ड्यांनी घेतला दाम्पत्याचा बळी
समजलेल्या माहितीनुसार, जळगावच्या शिरसोली भागातील रहिवासी असलेले मधुकर पाटील हे त्यांच्या पत्नी गोडबाई पाटील यांच्यासह दुचाकी (एम.एच.19 सी.एम.9125) ने महामार्गावरून जात असताना जळगावकडून धुळ्याकडे लोखंडी पत्रे घेवून जाणारा कंटेनर (ओ.डी.15 एफ.2751) ने दुचाकीला धडक दिल्याने दाम्पत्य कंटेनरच्या पुढील चाकात आल्याने जागीच मृत झाले. रविवारी सकाळी साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास पारोळा-एरंडोल महामार्गावरील हिरापूर फाट्याजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर कंटेनरचालक जागीच वाहन सोडून पसार झाला.

अपघातानंतर पारोळा पोलिसांची धाव
अपघाताची माहिती कळताच पारोळा पोलिस ठाण्याचे निरीक्षक लिलाधर कानडे, काशीनाथ पाटील, पंकज राठोड, विनोद माळी, सुनील साळुंखे आदींनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव सामान्य रुग्णालयात हलवले.
अपघातानंतरही सार्वजनिक बांधकाम विभाग सुस्त
गेल्या आठ दिवसांपूर्वीदेखील महामार्गावरील म्हसवे शिवारात अपघात होवून एकाचा बळी गेला होता. हा अपघात देखील महामार्गावरील खड्ड्यांमुळे झाला मात्र त्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली नाही. रविवारचा अपघातदेखील खड्डे चुकवताना झाल्याने दाम्पत्याचा बळी गेल्याचे बोलले जात आहे. जळगाव-एरंडोलदरम्यान महामार्गाची अक्षरशः चाळण झाली असून अपघात नित्याचे झाले आहेत. किमान आतातरी दखल घ्यावी, अशी माफक अपेक्षा वाहनधारक व्यक्त करीत आहेत.


