पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती चाळीसगावात उत्साहात साजरी
चाळीसगाव : धनगर समाज उन्नती मंडळ व मल्हार सेना चाळीसगाव यांच्या विद्यमाने शहरात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मंगळवारी सकाळी समाजाचे ज्येष्ठ नागरिक व पत्रकार रमेश जानराव व रजनी जानराव यांच्या हस्ते सपत्नीक पुतळा पूजन करण्यात आले. सकाळी 9 वाजता पूजनानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून मोटर सायकल रॅली काढण्यात आली. रॅलीला समाजाचे अध्यक्ष साहेबराव आगोने यांनी पिवळा झेंडा दाखवून शुभारंभ केला.
समाजबांधवांची उपस्थिती
यावेळी सर्व समाज बांधव उपस्थित होते. सायंकाळी 5 वाजता पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात येणार आहे. मिरवणूक सदर बाजार ,आंबेडकर चौक, घाट नागद चौफुली मार्गे अहिल्यादेवी चौकात समाप्त करण्यात येईल. या कार्यक्रमांसाठी जळगाव जिल्ह्याचे खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार राजीव देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे. नागरीकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी धनगर समाज उन्नती मंडळ व उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले.








