जळगावची लेक ‘तन्वी मल्हारा’ झळकणार कलर्स टीव्हीवर
जळगाव : कलर्स टीव्ही या लोकप्रिय हिंदी चॅनलवर आजपासून सुरु होत असलेला नवीन शो ‘मुस्कुराने की वजह तुम हो’ सर्व जळगावकरांसाठी अभिमानाची बाब ठरणार आहे कारण या शो मध्ये प्रमुख भूमिकेत आपल्या जळगावची तन्वी मल्हारा झळकणार आहे. आजपासून म्हणजे 1 जूनपासून सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 8.30 वाजता हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात कुणाल जयसिंग, अभिषेक मलिक, अलिशा परवीन, नेहा नारंग सारखे अनेक सुप्रसिद्ध कलाकार दिसणार आहे. नैनितालच्या भूमीवर चित्रित ‘मुस्कुराने की वजह तुम हो’ या शोमध्ये तन्वी ‘कथा’ नावाच्या मुलीची भूमिका साकारत असून अभिनेता कुणाल जयसिंग हा नायक म्हणजे ‘कबीर’ ची भूमिका साकारणार आहे. या दोघांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री पाहणे प्रेक्षकांसाठी खरोखरच मजेदार असेल.
जळगावचा कलाकाराने उमटवला ठसा
तन्वी मल्हारा हिने यापूर्वी मिस मल्टिनॅशनलचा खिताब जिंकून जळगावचे नाव सुवर्णाक्षरात कोरले होते. यंदाही तिने थेट स्मॉल स्क्रीनवर झेप घेऊन कला व अभिनय क्षेत्रात जळगावला नवा कीर्तिमान मिळवून दिला आहे. तन्वी ही मल्हार कम्युनिकेशन्सचे सीईओ आनंद मल्हारा यांची मुलगी असून ती एक आरजे (रेडिओ जॉकी), होस्ट व मोटिव्हेशनल स्पीकर देखील आहे. तन्वीचा लहान भाऊ तनय मल्हारा यानेही यापूर्वी स्टार प्लस वरील शो ‘डान्स प्लस सिझन 2’ जिंकला होता. त्यावेळी देखील जळगावचे नाव देशपातळीवर उंचावले होते. तन्वीच्या या कामगिरी पुन्हा एकदा जळगावकरांना ही संधी मिळाली असून आपल्या मनपसंत टीव्ही शो मध्ये आपल्याच शहराची लेक दिसेल यापेक्षा अभिमानास्पद काय असावं अशी प्रतिक्रिया या शोचा प्रोमो पाहिल्यानंतर येत आहेत. जळगावची लेक तन्वीचे मनोबल वाढवण्यासाठी या शोला प्रेक्षकांनी अधिकाधिक प्रमाणात प्रेम द्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.
