ऑनलाईन प्रशिक्षणाचे वाजले बारा : प्र.ह.दलाल यांचा आरोप


भुसावळ : प्रशिक्षण घ्या या मागणीसाठी शिक्षक व त्यांच्या संघटनांनी आंदोलन केल्यानंतर अखेर शासनाने 1 जूनपासून माध्यमिक शाळांतील शिक्षकांसाठी ऑनलाईन सेवांतर्गत प्रशिक्षण सुरू केले पण त्याचा पूर्ण फज्जा उडाला आहे. हे प्रशिक्षण गेल्या सात वर्षांपासून घेतलेच नाही त्यामुळे आधीच अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत शिवाय हयाही प्रशिक्षणाचे बारा वाजले असल्याचा आरोप भुसावळातील शिक्षणतज्ज्ञ प्र.ह.दलाल यांनी केला आहे.

नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न
नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न असाच काहीसा प्रकार घडला आहे. पासवर्ड, लॉगीन होत नाही, इंटरनल सर्व्हर एरर असे मेसेज येत आहेत. काही ठिकाणी नेट वर्कचाहि प्रॉब्लेम येत आहे. खरे म्हणजे प्रशिक्षण ऑन लाईन घेण्याचा अट्टाहास कश्यासाठी? आधी आमचे प्रशिक्षण आयोजित करा म्हणून शिक्षकांना आरडाओरड करावी लागली. नंतर शासनाने ते करू पण त्यासाठी प्रत्येकी दोन हजार रुपये नोंदणी फी आकारली. ती रद्द करण्याची मागणी करण्यात आली पण अद्याप शासन मौन धरून आहे. खरे तर प्रशिक्षण न घेताही शिक्षकांना वरीष्ठ व निवड श्रेणी दिली असती तर काय आकाश कोसळले असते? प्रशिक्षण घेतल्याने काय मोठी क्रांती होणार आहे? यापूर्वीच्या प्रशिक्षणाचे काय अनुभव आहेत? मग हवाच कशाला प्रशिक्षणाचा हट्ट? असा प्रश्न दलाल यांनी उपस्थित केला आहे.

सात वर्षात एकही प्रशिक्षण नाही
गेल्या सात वर्षांत एकही प्रशिक्षण शासनाने आयोजित केले नाही. या कालावधीत अनेक शिक्षक सेवानिवृत्त झाले आहे.त त्यांच्या बाबतीत आता काय निर्णय घेणार? आणि हेच प्रशिक्षण जूनच्या पहिल्या आठवड्यात व तेही ऑफ लाईन घ्यायला कोणती अडचण होती? पण कोणी निंदा कोणी वंदा कसेही निर्णय घेणे हाच आमचा वसा; हाच शासनाचा उपक्रम दिसतो. ऑन लाईनमध्ये अडचणी कमी आहेत काय? आणि याची जाणीव वरीष्ठ अधिकार्‍यांना नाही का? आणि नसेल तर तेच मुळात अकार्यक्षम असे समजून त्यांच्यासाठीच खरे तर एक प्रशिक्षण घ्यायला हवे, असेही दलाल यांनी कळवले आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !