अंतिम प्रभाग रचनेच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार : प्रा.धीरज पाटील
भुसावळ : भुसावळ नगरपरीषदेची प्रारूप प्रभाग रचना करताना महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने 6 ऑक्टोबर 2021 रोजी सर्व जिल्हाधिकार्यांना दिलेल्या परिीपत्रक क्रमांक- रानिआ/नप-2021/प्र.क्र.3/का-6 चे नियम, निकषांची अंमलबजावणी करण्यात आली नाही म्हणून जिल्हाधिकारी, जळगाव तसेच मुख्याधिकारी, भुसावळ यांच्याकडे प्रारूप प्रभाग रचना व नकाशावर हरकती नागरीकांनी सादर केल्या. 21 मे 2022 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात या हरकतींवर सुनावणी झाली परंतु सर्वच हरकती फेटाळण्यात आल्या आहेत. अंतिम रचनेत हरकतीनुसार कोणताही बदल करण्यात आला नाही. भुसावळ नगरपरीषदेची प्रारूप आणि अंतिम प्रभाग रचना राजकीय दबावातून करण्यात आली असावी, अशी शंका तक्रारदारांना असल्याने या संदर्भात उच्च न्यायालयात दाद मागणार शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांनी कळवले आहे.
चुक समोर येईल म्हणून हरकतींवरचे निर्णय दिले नाही
रानिआ/नप-2011/प्र.क्र.5/का.6,.दि.01/07/2011 पत्रानुसार स्वयंस्पष्ट आदेश पारीत करून हरकतींवरील निर्णयाच्या प्रती तक्रारदारास उपलब्ध करून देण्यात येतात परंतु अश्या कोणत्याही निर्णयाच्या प्रती कोणत्याही तक्रारदारास निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी, जळगाव अथवा मुख्याधिकारी, भुसावळ यांनी दिलेल्या नाहीत. रचना करणार्या अधिकार्यांची चूक समोर येईल म्हणूनच हरकतींवरील निर्णयाच्या प्रती तक्रारदारास देण्यात आलेल्या नसाव्यात असे तक्रारदारांचे म्हणणे आहे.
अंतिम रचनाही चुकीचीच
प्रगणक गटांचे क्रमांक व त्या प्रगणक गटांची लोकसंख्या, जनगणना प्रभागांच्या सीमा, निळ्या रंगाने दर्शविण्यात आलेल्या नाहीत. नकाशावर शहरातील महत्वाचे नैसर्गिक नाले, मुख्य रस्ते, फ्लायओव्हर इत्यादी स्पष्टपणे दर्शविले नाहीत. अंतिम प्रभाग रचनेत राज्य निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन झाले नसल्याने ही रचनाच चुकीची आहे. याबाबत माहिती घेऊन शिवसेनेतर्फे तालुका संघटक प्रा.धीरज पाटील व शहरातील अनेक नागरिक उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.







