पंतप्रधान सन्मान निधीसाठी शेतकर्‍यांना फिरवल्यास याद राखा

मुक्ताईनगर शहरात मनसे पदाधिकार्‍यांची तहसील प्रशासनाला तंबी : तर तीव्र आंदोलनाचा इशारा


मुक्ताईनगर : तालुक्यातील शेतकर्‍यांना पंतप्रधान सन्मान निधी मिळण्यास शेतकर्‍यांना अडचण येत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुक्ताईनगरतर्फे नायब तहसीलदार प्रदीप झांबरे यांना निवेदन देण्यात आले. पंतप्रधान किसान सन्मान निधीसाठी शेतकर्‍यांना फिरवल्यास याद राखा, असा सज्जड इशारा पदाधिकार्‍यांनी देत समस्या न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिल्याने तहसीलच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

शेतकर्‍यांची होतेय फिरवा-फिरव
निवेदनाचा आशय असा की, सन 2019-20, 2021-2022 या वर्षापासून केंद्र सरकारने शेतकर्‍यांसाठी किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे. अनेक शेतकर्‍यांना याचा लाभ मिळत आहे परंतु काही बहुतांशी प्रकरणे प्रलंबित आहेत. खात्यात रक्कम वर्ग होत नाही, काहींचे बँक खाते बदलायचे आहे, नाव दुरुस्ती आहे, काही नवीन वारसांना या योजनांचा लाभ घ्यायचा आहे. मुक्ताईनगर तहसीलदारांनी नवीन रजिस्ट्रेशन अथवा नाव दुरुस्ती, बँक दुरुस्ती प्रकरणांसाठी ऑफलाईन अर्ज करण्यास सांगितले होते, ते शेतकर्‍यांनी केले सुध्दा आहे, पुन्हा शेतकरी तहसीलकडे गेले असता त्यांना आता सीएससी सेंटरला प्रकरणे ऑनलाईन करा, सेंटरकडे गेल्यावर त्यांचे म्हणणे आहे की, तहसीलदार प्रकरणे ऑनलाईन मंजूर करत नाही, सीएससी सेंटर कृषी अधिकार्‍यांकडे अंगुली निर्देश करत असून कृषी अधिकारी मात्र आम्हाला विभागीय आयुक्तांकडून कोणत्याच सूचना अथवा लेखी पत्र आलेले नाही, किसान सन्मान निधी योजनेचे काम आम्ही का करावे? अशी उत्तरे दिली जात असल्याने शेतकरी या प्रकारांना वैतागले आहेत.

तर तीव्र आंदोलन छेडणार
शेतकर्‍यांना फिरवा-फिरव करणे थांबवा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करून अधिकार्‍यांना धडा शिकवण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकार्‍यांनी प्रशासनाला दिला आहे. निवेदनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुकाध्यक्ष मधुकर भोई, तालुका उपाध्यक्ष श्रीराम भोई, मंगेश कोळी, गजानन पाटील, निखील झनके, सुनील भील, मुकेश झाल्टे, आकाश कोळी आदी मनसे सैनिक उपस्थित होते.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !