भुसावळ तालुक्यात पावसाने अनेक भागात नुकसान : शेतकर्यांना मात्र दिलासा
भुसावळ : शहरासह परीसरात शनिवारनंतर सलग दुसर्या दिवशी रविवारी पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे मात्र काही भागात झालेल्या दमदार पावसामुळे घरांसह वृक्ष उन्मळून पडल्याचे वृत्त आहे. शहराचा रविवारी आठवडे बाजार असल्याने अचानक आलेल्या पावसाने विक्रेत्यांची तारांबळ उडाली तर शहरातील सखल भागात पाणी साचले शिवाय खड्डेमय रस्त्यांमुळे शहरवासीयांना चांगलाच मनस्ताप सोसावा लागला.
सलग दोन दिवसांपासून पावसाची हजेरी
यंदा मान्सुन 11 जून रोजी हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने यापूर्वीच वर्तवला असलातरी तो यंदा मात्र खरा ठरला आहे. शहरासह परीसरात शनिवारी रात्री आठ वाजेनंतर हलक्या पावसाच्या सरी बरसल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता तर रविवारीदेखील दुपारी अचानक वातावरण बदलले व पावसाला सुरूवात झाली. पहिल्याच पावसाचा चिमुकल्यांनी मनमुराद आनंद लुटला.
तालुक्यात पावसाने नुकसान
शहरात पावसाचा जोर नसलातरी तालुक्यातील कुर्हा, वांजोळा, वरणगाव दमदार पावसाने हजेरी दिली. तालुक्यातील जाडगाव येथे एका घरावर वृक्ष उन्मळून पडल्याने घराचे मोठे नुकसान झाले तर वरणगाव येथील भर वस्तीतील विठ्ठल मंदिरावरही वीज पडल्याचे वृत्त आहे. सुदैवाने अप्रिय घटना टळल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. शनिवारी रात्री काही भागात वीज वाहिन्या तुटल्याने काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला असून महसूल विभागाने पंचनाम्यांना वेग देण्यात आला आहे. शनिवारी सुमारे 22 मिलिमीटर पाऊस झाल्याची माहिती तहसीलच्या सूत्रांनी दिली. पावसाच्या आगमनाने शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला असून शेती कामांना आता वेग येणार आहे तर शंभर मिलिमीटर पाऊस झाल्यानंतर पेरण्यांना वेग येणार आहे तर काही शेतकर्यांनी यापूर्वीच पेरण्या आटोपल्या आहेत. भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव मंडळात 12 तर वरणगाव 10 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली.