जळगाव जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा रूग्णालयांमध्ये होणार दिव्यांग तपासणी शिबिर

मुक्ताईनगरचे डॉ.विवेक सोनवणे यांच्या लढ्याला यश


मुक्ताईनगर : शासन निर्णयानुसार प्रत्येक उपजिल्हा रूग्णालयांमध्ये दिव्यांग तपासणी शिबिर घ्यावे यासाठी स्वाभिमानीचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे यांनी पाठपुरावा केला होता. या मागणीला यश आले असून जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्याबाबतचा निर्णय झाला.

पाठपुरावा ठरला मोलाचा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे यांनी प्रजासत्ताकदिनी, स्वातंत्र्यदिनी वारंवार आंदोलन व मोर्चे काढुन दिव्यांग व्यक्तींच्या इतर मूलभूत मागण्यांसह शासन निर्णयानुसार दिव्यांग तपासणी शिबिर हे प्रत्येक उपजिल्हा रुग्णालयात घेण्यात यावे यासाठी मागणी लावून धरली होती. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हा शल्य चिकित्सक, जळगाव व अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव यांना शासन निर्णयानुसार उपजिल्हा रुग्णालयांमध्ये दिव्यांग तपासणी शिबिर घेण्याचे आदेश दिले तर उपजिल्हा रुग्णालय, मुक्ताईनगर येथे काही महिन्यांपासून दिव्यांग तपासणी शिबिर सुरू करण्यात आले आहे शिवाय जामनेर, चोपडा, चाळीसगाव या उपजिल्हा रुग्णालयातदेखील दिव्यांग तपासणी शिबिर घेण्याचे कार्यालयीन आदेश जिल्हा शल्यचिकित्सकांनी काढल्याने दिव्यांग बांधवांची गैरसोय टळली असून मनस्तापही कमी झाला आहे. दिव्यांग व्यक्तींकडून तसेच परिसरातील नागरीकांकडून स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे व दिव्यांग जणकल्याण संस्थेचे कौतुक होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !