चार गुन्ह्यातील सहा आरोपी भुसावळ लोहमार्ग पोलिसांच्या जाळ्यात


भुसावळ : शहरातील लोहमार्ग पोलिसांनी चार वेगवेगळ्या दाखल घटनेतील सहा आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. रेल्वे पोलिस पथकाने ही कारवाई लोहमार्ग पोलिस अधिक्षक वैभव कलुबर्मे व लोहमार्ग पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.लोहमार्ग पोलिस ठाण्यात 8 नोव्हेंबर 19 रोजी नंदकिशोर मोतिराम धरम (63, रा.इंदौर, म.प्र) हे अप कर्नाटक एक्सप्रेस मधील सामान्य डब्यातून प्रवास करीत असतांना कर्नाटक एक्स्प्रेस भुसावळ येथून सुटल्यानंतर त्यांच्याकडून आरोपीने सहा हजार 500 रुपये रोख रक्कम चोरुन नेली होती.त्यांच्या फिर्यादीवरुन रेल्वे पोलिसात गुरनं.1274/19, भादंवि 379 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. या घटनेत शुक्रवार, 29 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता रेल्वे स्थानकावरील तीन नंबर फलाटावर अप नवजीवन एक्सप्रेस आली असता हवालदार हिरालाल जाधव, कॉन्स्टेबल सहारे यांना संशयास्पदरीत्या एक इसम आढळल्याने त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव शे.निसार शे.वजीर उर्फ बाबन्या (34, रा.गौसीयानगर, गौसिया मशिदीमागे भुसावळ) असे नाव सांगून चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून सहा हजार 500 पैकी दोन हजार रुपये हस्तगत करण्यात आले. तपास हवालदार हिरालाल जाधव करीत आहे.

अन्य तीन गुन्ह्याचांही उलगडा
दुसर्‍या घटनेत, सविता संजय तारुक ( 40, रा.सावतर निंभोरा ता. भुसावळ) या .25 ऑक्टोबर रोजी गाडी क्र. 11058 अप पठाणकोठ एक्सप्रेस मधील महिला डब्यातून प्रवास करित असतांना त्यांची लेङीज पर्स व त्यातील 1800 रुपये रोख व कागदपत्रे चोरीला गेली होती. या गुन्ह्याचा तपास करतांना शुक्रवार, 29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता तीन नंबर फलाटावरुन स्वप्नील देविदास पाटील (27, रा. किरंगेवाडा, सुभाष चौक, फैजपूर)यास ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून एक हजार 800 रुपयांपैकी 500 रुपये जप्त करण्यात आले. त्यास अटक करण्यात आली. तपास पोलिस नाईक दिनकर कोळी करीत आहे. तिसर्‍या घटनेत, जय रामचरण पटेल (21, रा.भाईंदर, मुंबई) हे शुक्रवार, 29 नोव्हेंबर रोजी गाडी क्र. 12167 डाऊन एलटीटी-मंडुवाडी एक्स्प्रेसच्या कोच नं.बी.2 मधील बर्थ 10 वरुन प्रवास करीत असतांना जळगाव ते भुसावळ दरम्यान त्यांचा अज्ञात चोरट्यांनी नऊ हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरुन नेला. याबाबत गुन्हा दाखल झाल्यावर काही वेळातच रेल्वे आऊटरवर बलराम नन्नुभील ठाकुर (26, रा.तीन पुलिया, खंडवा म.प्र) यास ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली देत या चोरीतील मोबाईल पोलिसांना काढून दिला. त्यास अटक करण्यात आली असून तपास पोलिस उपनिरीक्षक अनिल केरुरकर करीत आहे. चौथ्या घटनेत, अजय बंडु अत्राम (19, रा.बाभुळगाव, यवतमाळ) व त्याचे सोबत रामदेव सुरेश निसाळ (19, रा.नवागड, छत्तीसगड) हे दोघे गुरुवार, 28 नोव्हेंबर रोजी गाडी क्र. 12130 अप आझादहिंद हावडा पुणेच्या सामान्य डब्यातून प्रवास करीत असताना गाडीने भुसावळ सोडल्यावर जळगाव दरम्यान तीन अज्ञात चोरट्यांनी या दोघांना चाकूचा धाक दाखवून लाथा-बुक्क्यांनी मारहाण करीत रोख रक्कम दोन हजार 500 रुपये व सहा हजार 270 रुपयांचा मोबाईल बळजबरीने लांबवला होता. त्यांच्या फिर्यादीवरुन रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेच्या तपासात रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी या घटनेतील शहारुक कलीम खान (20), अजहर खान अय्युब खान (22, दोन्ही रा.सावदा) या दोघांना अटक करीत लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेतील मुख्य आरोपी गुलाबशहा उर्फ राजु ( 22, रा. सावदा) हा सावदा येथे त्याची घरी असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरुन लोहमार्गच्या डीबीतील पथकातील हवालदार नितीन पाटील, शैलेश पाटील, जयकुमार कोळी यांनी सावदा येथे जाऊन त्यास अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली देत चोरीच्या घटनेतील मोबाईल पोलिसांच्या ताब्यात दिला. त्यास अटक करण्यात आली. तपास सहाय्यक निरीक पौर्णिमा राखुंडे व सुनील इंगळे करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !