Flights worth crores from shopping in Bhusawal भुसावळात खरेदीतून कोटींची उड्डाणे


Flights worth crores from shopping in Bhusawal भुसावळ : अडीच वर्षांनी कोरोनाचे संकट ओसरल्यानंतर यंदाच्या दिवाळी सणानिमित्त बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण पसरले आहे. भुसावळातील व्यापार्‍यांना दिवाळीमुळे दिलासा मिळाला असून शहरातील रस्ते ग्राहकांच्या गर्दीने फुलले आहेत. वाहन बाजाराने टॉप गियर घेतला असून सोन्यालाही झळाळी आली आहे तर सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळी सणानिमित्त शहरातील कपडा मार्केटमध्येही दररोज लाखो रुपयांची उलाढाल होताना दिसून येत आहे.

फराळांसह कपड्यांना मागणी
शहरात दिवाळी सणानिमित्त फराळ, कपडे, पणत्या, रांगोळी, आकाश कंदिल आदी साहित्यांची मोठ्या प्रमाणावर ग्राहकांकडून खरेदी करण्यात येत असल्याने या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर उलाढाल होताना दिसून येत आहे. कागदी आणि प्लास्टिकच्या आकर्षक आकाश कंदिलांनी ग्राहकांचे लक्ष वेधले तर प्रकाशाचे पर्व असलेल्या सणात विविध रंगाच्या रांगोळीला तसेच दिव्यांनाही मोठी मागणी राहिली तर सणानिमित्त रेडिमेड कपड्यांना अधिक ग्राहकांची पसंती असल्याने शहरातील सर्वच दुकानांमध्ये ग्राहकांची गेल्या दोन दिवसांपासून गर्दी वाढली असून रात्री उशिरापर्यंत ग्राहकांची गर्दी कायम आहे.

इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंनाही मागणी
डीआरएम कार्यालय, ऑर्डनन्स फॅक्टरी, लष्करी डेपो, दीपनगर प्रकल्प आदींमुळे मोठ्या प्रमाणावर शहरात नोकरदारांची संख्या आहे तर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिळालेल्या बोनसनंतर शहरात इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीत त्यामुळे वाढ झाली आहे. मोबाईल, लॅपटॉप टीव्हीसह इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या शोरुममध्ये रात्री उशिरापर्यंत ग्राहकांची गर्दी कायम होती तसेच दुचाकी, चारचाकी वाहनांच्या कंपन्यांकडून आकर्षक ऑफर्स जाहीर झाल्याने झाल्याने वाहन बाजारातही लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.

फराळाला मोठी मागणी
दिवाळी फराळातील चिवडा, शंकरपाळे, करंजी, चकली आदी फराळाच्या साहित्याला ग्राहकांकडून चांगली मागणी असून शहरातील विविध भागात यंदा स्टॉलही त्यानिमित्त लावण्यात आले आहेत. तेलाचे भाव वधारल्याने या वस्तूंच्या किंमतीतही वाढ झाली आहे. शहरातील अनेक स्वीट मार्ट्स आणि खाद्यपदार्थांची दुकाने दिवाळीसाठी तयार फराळ आणि गोड पदार्थांनी सजली असून ग्राहकांकडून या फराळांना मोठी मागणी वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !