भुसावळात 203 सार्वजनिक मंडळांत आदिशक्तीची स्थापना
नवरात्रोत्सवामुळे बाजारपेठेत चैतन्य : वाहनांसह घर खरेदीवर भर ; दसर्यापर्यंत उलाढाल वाढणार
भुसावळ (रविवार, 11 ऑक्टोबर 2026) : शारदीय नवरात्रोत्सवाला शनिवारपासून प्रारंभ झाला असून उत्सवामुळे भाविकांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठेतही चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. हा उत्सव आगामी दसरा-दिवाळीपर्यंत कायम राहणार असल्याची व्यापारीवर्गाला आशा आहे. भुसावळातील 203 सार्वजनिक मंडळांमध्ये नवदुर्गेची मोठ्या उत्साहात विधीवत स्थापना करण्यात आली.
बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये खरेदीची लगबग वाढली आहे. गांधी चौक, सराफ बाजार आणि जामनेर रोड परिसरात घट, देवीचे मुखवटे, चुनरी, झेंडूच्या फुलांच्या माळा आणि तोरणे खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढली आहे. देवीला वाहण्यासाठी सजावटीसाठी तसेच ठिकठिकाणी फुलांची मागणी असल्याने मोठ्या प्रमाणावर शहरातील बाजारात झेंडूच्या फुलांची आवक वाढली आहे शिवाय नवरात्रीच्या उपवासानिमित्त फळांनाही मोठी मागणी वाढल्याचे दिसून आले. सोमवार वा मंगळवारपासून गरबा-दांडिया सुरू होणार असल्याने चनिया-चोली आणि केडिया पोशाख खरेदी करण्यासाठी महिलांसह तरुणाईची गर्दी वाढली आहे.

शुभ मुहूर्तावर घटस्थापना
नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी पहाटेपासूनच भाविकांची घटस्थापनेची तयारी सुरू होती. सकाळी 6 वाजून 19 मिनिटे ते 10 वाजून 12 मिनिटे या कालावधीत तसेच अभिजात मुहूर्तावर सकाळी 11 वाजून 44 मिनिटे ते दुपारी 12 वाजून 31 मिनिटे या वेळेत अनेक ठिकाणी देवीच्या घटाची स्थापना करण्यात आली. घराघरांत धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे.
भुसावळात 203 सार्वजनिक मंडळे
भुसावळ शहरात यंदा सार्वजनिक नवरात्रोत्सवाची मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 130 तर भुसावळ शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 73 सार्वजनिक मंडळांनी नवदुर्गेची स्थापना केल्याचे सांगण्यात आले.
आवाज मर्यादा ओलांडल्यास होणार कारवाई
गणेशोत्सवात आवाजाची मर्यादा ओलांडणार्या मंडळावर पोलिसांनी कारवाई करीत त्याबाबत अहवाल न्यायालयात पाठवला असून नवरात्रोत्सवाही नॉईस मीटरद्वारे आवाजाची तपासणी करण्यात येईल, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. ध्वनिप्रदूषणासंबंधीच्या मर्यादा आणि उत्सवाच्या वेळेबाबत घालून दिलेल्या अटींचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील देवी मंदिरांसह सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांच्या परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट आणि भव्य मंडप उभारण्यात आले आहेत.




