भुसावळात विवाहितेवर चाकूहल्ला : कुविख्यात तस्लीम काल्यासह तिघे ताळ्यात
‘जंक्शन’मध्ये गुन्हेगारी बोकाळली : कुविख्यात तस्लीम काल्यासह तीन आरोपींना बाजारपेठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या
भुसावळ : बाजारपेठ पोलिस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा मागे घ्यावा या कारणातून शहरातील जामनेर रोडवरील इंदिरा नगरातील ३५ वर्षीय विवाहितेवर कुविख्यात गुंड तस्लीम काल्यासह त्याच्या अन्य दोन साथीदारांनी चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना बुधवार, १६ रोजी रात्री ७.४५ वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात विवाहिता गंभीर जखमी झाली असून तिच्यावर ट्रामा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू असून तिघा आरोपींना घटनेनंतर दिड तासातच अटक करण्यात आली. फरजाना बी.शेख सलीम (३५, इंदिरा नगर, जामनेर रोड, भुसावळ) असे जखमी विवाहितेचे तर तस्लीम शेख उर्फ काल्या सलीम शेख, करीम शेख सलीम शेख व गिरीश जोहरी (सर्व रा.भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
केस मागे घेण्याच्या कारणावरून चाकूहल्ला
तक्रारदार फरजाना बी.शेख सलीम (३५, इंदिरा नगर, जामनेर रोड, भुसावळ) या पती, सासु, मुलगा व चार मुलींसह वास्तव्यास असून घरकाम करून उदरनिर्वाह करतात. सुमारे चार वर्षांपूर्वी तक्रारदाराच्या बहिणीला आरोपी तस्लीम काल्याने मारहाण केल्याने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने हा गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपी दबाव टाकत होता शिवाय खुन्नसदेखील ठेवून जीवे ठार मारण्याची धमकी देत होता. बुधवारी रात्री पावणेआठ वाजता घराबाहेर विवाहिता फरजाना बसल्या असताना आरोपी तस्लीम काल्यासह करीम शेख सलीम शेख व गिरीश जोहरी आले व त्यांनी शिविगाळ सुरू करीत दाखल केस मागे घे अन्यथा जीवे ठार मारेल, अशी धमकी दिली. आरोपी तस्लीम काल्याने कमरेला लावलेला चाकू काढून गळ्यावर, छातीवर व पोटावर वार केला तर यावेळी सासूने आरडा-ओरड केल्याने आरोपींनी पळ काढला.


आरोपींच्या दहशतीमुळे नागरीकांनी घरे केली बंद
आरोपींच्या दहशतीमुळे नागरीकांनी घराचे दररवाजे लावून घेतले व घराबाहेर कुणीही आले नाही. कुटुंबीयांनी तातडीने महिलेला ट्रामा केअर सेंटरमध्ये हलवल्यानंतर तातडीने उपचार करण्यात आले. दरम्यान, बाजारपेठ पोलिसांनी चाकू हल्ल्यानंतर दिड तासांनी आरोपींनी मोकळ्या जागेतून अटक केली.