हिमाचल प्रदेशात खून : संशयीत रेल्वेने मुंबईकडे निघाले मात्र पैसे संपताच जळगावात उतरताच पडल्या बेड्या
जळगाव (गुरुवार, 1 ऑक्टोबर 2026) : दारू पिताना संशयीतांमध्ये झालेल्या वादानंतर आरोपींनी जवळच्या व्यक्तीवरच हल्ला करीत त्याचा खून केला. ही घटना हिमाचल प्रदेशात घडली व प्रकरण अंगलट नको म्हणून संशयीतांनी रेल्वेने मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू केला मात्र जळगाव येण्यापूवी पैसे संपल्याने व भूक लागल्याने संशयीत जळगावात उतरले व त्याचवेळी आरोपींबाबत जळगावच्या शनीपेठ पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी चार संशयित आरोपींना अटक केली.
या आरोपींना अटक
चंदन कुमार विलास मुखिया (कुतूबपूर गिरी, बिहार), रोशन गोगल विरजू मुखिया (कुतूबपूर गिरी, सकरा, बिहार), संतोष कुमार देविंदर साह (बरियारपूर, बिहार), अजित कुमार जोगा मेहतो (पंडरक, पाटणा, बिहार) अशी अटक केलेल्यांची नावे आहे. शनिपेठ पोलिसांच्या सतर्कतेमुळे आरोपी जाळ्यात अडकल्याने पोलिसांच्या कृतीचे कौतुक होत आहे.
काय आहे प्रकरण?
हिमाचल प्रदेशातील मुकेश कुमार या तरुणासोबत संशयीत एकत्र दारू पीत असताना त्यांच्यात वाद झाला. आरोपींच्या बहिणीवरून शिविगाळ झाल्यानंतर आरोपींनी मुकेश कुमार यांच्यावर हल्ला करून त्यांचा खून केला व त्यानंतर आरोपी अटकेच्या भीतीने मुंबईच्या दिशेने निघाले. आरोपी किसंपूर येथून गुरुवारी सकाळी सुमारे 11 वाजता निघाले. त्यानंतर ते अंबाला येथे पोहोचले. तेथून दुपारी सुमारे 4.30 वाजता मुंबई एक्स्प्रेसने मुंबईच्या दिशेने रवाना झाले. प्रवासादरम्यान आरोपींकडील पैसे संपले. त्यातच भूक लागल्याने मोबाईल विकण्यासाठी त्यांनी जळगावात उतरण्याचा निर्णय घेतला. हिमाचल प्रदेश पोलिसांनी आरोपींना ट्रॅक केल्यानंतर जळगाव शनीपेठ पोलिसांना माहिती दिली.
समन्वयाने आरोपी जाळ्यात
आरोपींचे लोकेशन जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आल्यानंतर पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना माहिती कळवण्यात आलीव शनीपेठ पोलिसांनी वेळ न दवडता आरोपींचा शोध सुरू केला. गुन्हे शोध पथकाने परिसरात शोधमोहीम राबवत आरोपींचा माग काढला. अखेर अत्यंत शिताफीने आणि समन्वयाने कारवाई करत चारही आरोपींना शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेण्यात आले. अटक केलेले चौघे बिहार राज्यातील रहिवासी आहेत. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी हिमाचल प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल, परिवेक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक संतोष खेडकर, अभिषेक कटारे, हवालदार विजय खैरे, योगेश जाधव, अनिल साळुंखे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश घुगे, नवजीत चौधरी, अमोल वंजारी, पराग दुसाने, रवींद्र साबळे आदींच्या पथकाने केली.
