जळगावात दोन लाखांचे 64 ग्रॅम एमडी जप्त : स्थानिक आरोपीला अटक
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : अटकेतील आरोपीविरोधात 35 गंभीर स्वरूपाचे गुन्हे
जळगाव (गुरुवार, 1 ऑक्टोबर 2026) : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीद्वारे कारवाई करत 64.44 ग्रॅम वजनाचा एमडी (मेफेड्रोन) अंमली पदार्थाचा साठा स्थानिक आरोपीकडून जप्त केला आहे. या कारवाईने एम.डी.विके्रत्यांच्या गोटात खळबळ उडाली आहे. अजय बिरजू गारूंगे (रा.तांबापुरा, कंजरवाडा, मेहरूण, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना एम.डी.ड्रग्जची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचला. जळगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील पाचोरा-नरसोद बायपासलगतच्या कचरा फॅक्टरी परिसरात गुरुवार, 1 रोजी दुपारी 2.20 वाजता संशयीत अजय गारूंगे येताच त्यास ताब्यात घेण्यात आले. झडतीत 64.44 ग्रॅम वजनाचा एमडी अंमली पदार्थ (अंदाजे एक लाख 93 हजार 320 रुपये किंमतीचा), 20 हजार रुपये किंमतीचा मोबाइल मिळून एकूण दोन लाख 13 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. अटकेतील आरोपीविरोधात यापूर्वी विविध गंभीर स्वरूपाचे तब्बल 35 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीशी संबंधित दोन संशयीतांचा कसून शोध सुरू आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, उपनिरीक्षक सोपान गोरे, उपनिरीक्षक विजय पाटील, एएसआय अतुल वंजारी, हवालदार अक्रम शेख, किशोर पाटील, प्रवीण भालेराव, मुरलीधर धनगर, रवींद्र कापडणे, गोपाळ पाटील, प्रदीप सपकाळे, राहुल रगडे, छगन तायडे, कॉन्स्टेबल मिलिंद जाधव, गौरव पाटील आदींच्या पथकाने केली.
