आवडीला कौशल्याची जोड देत व्यवसायाच्या क्षेत्रात पुढे या : प्रा.डॉ.प्रवीण महाले

भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयात युवतींसाठीच्या ‘मिशन साहसी’ अभियानाचा उत्साहात शुभारंभ


भुसावळ (गुरुवार, 1 ऑक्टोबर 2026) : ‘पॅशन्स, पॅशन आणि पर्सिव्हरन्स’ या त्रिसूत्रीचा उपयोग करून युवतींनी आपल्या आवडीला कौशल्याची जोड देत व्यवसायाच्या क्षेत्रात पुढे यावे. पारंपरिक नोकरीच्या संधींबरोबरच कौशल्याधारित व्यवसाय, विविध शासकीय योजना आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन प्रा.डॉ.प्रवीण महाले यांनी येथे केले. शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग अंतर्गत युवती सभा मार्फत युवतींसाठी ‘मिशन साहसी’ अभियानाचा उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी डॉ.महाले यांनी मार्गदर्शन केले.

यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक होते. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा.डॉ.प्रवीण महाले यांच्याहस्ते अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावर प्राचार्य डॉ.आर.पी.फालक, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.संजय चौधरी, युवती सभा सचिव प्रा.संगीता धर्माधिकारी उपस्थित होते.

उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा : प्राचार्य
प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी विद्यार्थिनींनी शिक्षणासोबतच व्यक्तिमत्त्व विकास, सामाजिक बांधिलकी, नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास वृद्धिंगत करण्यासाठी विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. ‘मिशन साहसी’ अभियानामुळे विद्यार्थिनींमध्ये धैर्य, आत्मविश्वास आणि स्वावलंबनाची भावना विकसीत होण्यास निश्चितच मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.

50 विद्यार्थिनींया सहभाग
प्रास्ताविक युवती सभा सचिव प्रा.संगीता धर्माधिकारी यांनी तर सूत्रसंचालन प्रा.डॉ.माधुरी पाटील व आभार प्रा.डॉ.जयश्री सरोदे यांनी मानले. महाविद्यालयातील 50 विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. विद्यार्थी विकास विभागप्रमुख प्रा.डॉ.संजय डी.चौधरी, प्रा.डॉ.अंजली पाटील, प्रा.डॉ.अनिल सावळे, प्रा.डॉ.जे.बी.चव्हाण, प्रा.सुशीला भाटे, प्रा.चेतन पारखे, प्रा.सागर सोनवणे, प्रा.अजय साळुंखे, युवती सभा विभागाने विशेष परिश्रम घेतले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !