एस.टी.चालकाच्या सतर्कतेने वाचले प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे प्राण


धरणगावनजीक ट्रकच्या हुलकावणीने बस उतरली पुलाखाली : वेळीच ब्रेक लावल्याने डीपीवर धडकली नाही बस

धरणगाव : जळगाव-अमळनेर बस धरणगावमार्गे अमळनेरकडे जात असताना गावाजवळील एस.के.जिनिंगजवळील पुलाजवळ भरधाव ट्रकने हुलकावणी दिल्याने अपघात टाळण्यासाठी बस चालकाने बस 10 फूट खोल पुलाखाली उतरवल्याने मोठा अपघात टळला मात्र या प्रकारात काही प्रवाशांसह विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. ही घटना बुधवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, बस चालकाने वेळीच ब्रेक लावल्याने बस 11 हजार व्होल्ट डीपीला धडकली नाही अन्यथा मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती मात्र प्रवाशांचे दैव बलवत्तर असल्यानेच अनर्थ टळल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

अपघात टाळण्यासाठी बस खाली उतरवली
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, जळगाव-अमळनेर बसला समोरून येणार्‍या भरधाव ट्रकने हुलकावणी दिल्याने चालक व्ही.बी.सैंदाणे यांनी बस (एम.एच.14 बी.टी.1330) रस्त्याच्या कडेला नेण्याचा प्रयत्न केला मात्र बस पुलाखाली उतरली मात्र सुदैवाने चालकाने ब्रेक वेळीच लावल्याने बस 11 हजार व्होल्ट प्रवाह असलेल्या विद्युत डीपीला धडकली नाही अन्यथा मोठा अनर्थ ओढवला असता. या प्रकरणी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्यासह कर्मचार्‍यांनी धाव घेत पंचनामा केला तसेच किरकोळ जखमींना रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था केली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !