जळगावातील टायर चोरटा भामटा धरणगाव पोलिसांच्या जाळ्यात
Tire thief in Jalgaon caught by Dharangaon police धरणगाव : धरणगावात टायर चोरी करताना एका संशयीताला अटक करण्यात आली तर दुसरा संशयीत मात्र पसार झाला आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोपडा रोडवरील टायर पंक्चर दुकानासमोर विक्रीसाठी ठेवलेले टायर चोरताना दिनेश कांतीलाल बडगुजर (रा.साई पॅलेस हॉटेलजवळ, जळगाव) यास अटक करण्यात आली असून त्याचा साथीदार मात्र पसार झाला आहे.
संशय आल्यानंतर आरोपीच्या आवळल्या मुसक्या
इम्रान शहा याकुब शहा (२६, रा बलचपुरा, धरणगाव) यांचे चोपडा रोडवर उमा टायर पंक्चर दुकान आहे. ३० नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अशोक लेलॅण्ड कंपनीची माल वाहु गाडी (छोटा हत्ती, क्रमांक एम.एच. १८ ए.ए. ४५५७) या वाहनात संशयीत दिनेश कांतीलाल बडगुजर (रा. साई पॅलेस हॉटेलजवळ, जळगाव) आणि एक अनोळखी व्यक्ती दुकानासमोरील ४०७ वाहनासाठी लागणारे १६ हजार रुपये किंमतीचे ८ टायर भरुन चोरी करीत असताना हॉटेल व्हाईट हाऊसचे अवधेश वाजपेयी यांनी हटकले व ही बाब दुकान मालक इम्रान शहाला कळवली.


कटरने हल्ला करण्याचा प्रयत्न
वाजपेयी यांनी दोघा संशयीतान हटकत काय करताय म्हणून विचारल्यानंतर चोरट्याने तुझं काम कर म्हणून गाडी चालवून नेण्याचा प्रयत्न केला परंतू वाजपेयी पुढं सरकल्यावर एका चोरट्याने त्यांच्यासोबत झटापट केली परंतू वाजपेयी यांनी कानशिलात लावताच गाडी चालकाने पळ काढला तर मागे टायर भरणार्याने देखील उडी मारून पळ काढला. यानंतर वाजपेयी यांनी गाडीत बसलेल्या दिनेश बडगुजर याला पकडले. त्याने वाजपेयी यांना कटर आणि बेल्टने मारण्याचे प्रयत्न केला परंतू वाजपेयी यांनी न घाबरता दिनेशला पकडून ठेवत पोलिस पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांना फोन करीत माहिती दिली. त्यांनी लागलीच पोलिस गाडी पाठवत चोरट्याला ताब्यात घेतले. याबाबत धरणगाव पोलिसात इम्रान शहा यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. दिनेश बडगुजरला पोलिसांनी अटक केली असून त्याला एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक उमेश पाटील करीत आहेत.
