भुसावळातील एन.के.नारखेडे स्कूलमध्ये स्काऊट-गाईड शिबिर उत्साहात

तंबू उभारणीपासून साहसी उपक्रमांपर्यंत विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग ; व्यक्तिमत्त्व विकास व प्रथमोपचाराचेही प्रशिक्षण


भुसावळ (शनिवार, 7 ऑक्टोबर 2026) : भुसावळ शहरातील एन.के.नारखेडे इंग्लिश मीडियम स्कूलमधील इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शुक्रवार, 9 ऑक्टोबर रोजी डिस्ट्रिक्ट कॅम्पिंग ग्राउंडवर शैक्षणिक स्काऊट-गाईड शिबिराचे आयोजन करण्यात आले. सकाळी 7 ते दुपारी 4 या वेळेत पार पडलेल्या या शिबिरात विद्यार्थ्यांनी विविध साहसी उपक्रमांसह जीवनोपयोगी कौशल्यांचे प्रशिक्षण घेतले.

आकर्षक तंबू उभारून सजावट
शिबिराची सुरुवात स्काऊट-गाईडच्या प्रार्थनेने व झेंडागीताने करण्यात आली. यावेळी शाळेतील स्काऊट-गाईड शिक्षिका पूनम भोळे आणि लॉर्ड गणेशा स्कूल, जामनेर येथील पंकज तिवारी यांनी विद्यार्थ्यांना तंबू उभारणीचे प्रशिक्षण दिले. उपलब्ध साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांनी आकर्षक तंबू उभारले व त्यांची सजावट केली. शाळेच्या पर्यवेक्षिका राखी बढे यांनी तंबूंची पाहणी करून विद्यार्थ्यांच्या कलात्मकतेचे व कौशल्याचे कौतुक केले.

साहसी उपक्रमांचे आयोजन
रेल्वेचे डिस्ट्रिक्ट कमिशनर ऑर्गनायझर संतोष श्रीवास्तव यांनी विद्यार्थ्यांना स्काऊट-गाईड चळवळीचे महत्त्व, शिस्त आणि सेवाभाव यांविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी रॅपलिंग, मंकी क्रॉल, टायर क्रॉल, ऑब्स्टॅकल, हँगिंग क्लाइंबिंग, लॅडर रोप आणि क्लाइंबिंग लॅडर अशा विविध साहसी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना धाडस, आत्मविश्वास आणि शारीरिक कौशल्ये विकसित करण्याची संधी मिळाली. दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला. त्यानंतर अभिजीत कुलकर्णी यांनी व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर मार्गदर्शन केले. उपलब्ध साधनांचा वापर करून आपत्कालीन परिस्थितीत प्रथमोपचार कसा करावा, याचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले.

देशभक्तीपर गीतांनी भक्तीमय वातावरण
शिबिराच्या समारोपप्रसंगी शेकोटीचा कार्यक्रम झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीते सादर करून वातावरण उत्साहपूर्ण केले. विविध कौशल्ये, साहसी उपक्रम, व्यक्तिमत्त्व विकास आणि प्रथमोपचार प्रशिक्षण अशा उपयुक्त बाबींनी परिपूर्ण असलेले हे शिबिर उत्साहात झाले. संस्थेच्या सर्व सभासदांतर्फे सहभागी स्काऊट-गाईड विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !