दहिगावच्या तरुणास शेतात काम करताना सर्पदंश
यावल : तालुक्यातील दहिगाव येथील एका 24 वर्षीय तरुणाला शेतात काम करत असतांना सर्पदंश झाला. हा प्रकार निदर्शनास येताच त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला येथून जळगावी हलवण्यात आले.
प्रकृती गंभीर : जळगावात हलवले
दहिगाव, ता.यावल येथील अलताफ खान कमाल खान (24) हा तरुण शुक्रवारी सकाळी शेतात काम करीत असताना त्याच्या उजव्या पायाला अचानक सापाने दंश केला. हा प्रकार निदर्शनास येताच त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारार्थ आणण्यात आले. रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवदास चव्हाण, डॉ. मयूर चौधरी, अधिपरीचारीका आरती कोल्हे, सुमन राऊत आदींनी त्याच्यावर उपचार केले मात्र त्याची प्रकृती अधिकच खालावल्याने त्याला तातडीने 108 रुग्णवाहिकेद्वारे पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले.

