धरणगावातील केंद्रीय जीएसटीच्या पथकाची छापेमारी
Central GST team raid in Dharangaon धरणगाव : शहरातील जीएस उद्योग समूहावर केंद्रीय जीएसटीच्या पथकाने छापेमारी केल्याने जिल्ह्यातील राजकीय तथा व्यापारी वर्गात प्रचंड खळबळ उडाली. धरणगावातील प्रसिद्ध उद्योगपती तथा माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या मालकीचा हा जीएस उद्योग समूह असून छापेमारीत काय हाती लागले याबाबत माहिती कळू शकली नाही.
नाशिकच्या पथकाकडून छापेमारी
बुधवारी सकाळी दहा वाजेपासून नाशिक येथील केंद्रीय जीएसटीच्या पथकाने जीएस उद्योग समूहाच्या दोन जिनिंग, दोन फॅक्ट्री आणि गावातील मुख्य ऑफिसवर एकाच वेळी छापेमारी केली. साधारण 15 अधिकारी कर्मचार्यांच्या पथक बुधवारी सकाळी 10 दहा वाजेच्या सुमारास तीन वाहनांमधून गावात धडकले. यावेळी त्यांनी आल्याबरोबर दोन्ही फॅक्ट्री सीज केल्या. त्यानंतर त्यांनी जीएसटीशी निगडीत कागदपत्र तपासले. मध्यरात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरूच होती.

कारवाईने उडाली खळबळ
पथकाने मार्केट कमेटीशी निगडीत कागदपत्र देखील तपासली. मार्केट फी वेळेवर भरली आहे का?, याची पथकाने जीएस उद्योग समूहाच्या खाजगी मार्केटची तपासणी केली असता त्यांना 2012 पासून तर डिसेंबर 2022 पर्यंत सर्व मार्केट फी भरली असल्याचे आढळल्याची प्राथमिक माहिती आहे. मध्यरात्री उशिरापर्यंत कारवाई सुरु असल्यामुळे गावात एकच चर्चा सुरू होती.
पथकाला सहकार्य : काहीही आढळले नाही : निलेश चौधरी
तपासणी दरम्यान, आम्ही संपूर्ण सहकार्य केले असून यानंतरही त्यांना सहकार्य केले जाईल. पथकाला काहीही चुकीचे आढळलेलं नसल्याचे माजी नगराध्यक्ष तथा जी.एस.उद्योग समूहाचे संचालक निलेश चौधरी म्हणाले. आम्ही आलेल्या पथकाला संपूर्ण सहकार्य केलेले आहे. त्यांना हव्या असलेल्या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता केल्याचे त्यांनी सांगितले.