अडावदमधील लाचखोर पोलिसासह होमगार्डची पोलीस कोठडीत रवानगी
Home guard sent to police custody along with corrupt cop in Adavad अडावद, ता.चोपडा : वाळूच्या ट्रॅक्टरद्वारे वाळू वाहतूक करू देण्यासाठी व कोणतीही कारवाई न करण्यासाठी तडजोडीअंती चार हजारांची लाच स्वीकारणार्या अडावदमधील पोलीस कर्मचार्यासह होमगार्डला जळगाव एसीबीच्या पथकाने शनिवारी पोलीस ठाण्याच्या आवारातून अटक केली होती. संशयीतांना रविवारी अमळनेर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलीस अंमलदार योगेश संतोष गोसावी (35, रा.पोलीस वसाहत, शासकीय निवासस्थान, अडावद) व होमगार्ड चंद्रकांत काशीनाथ कोळी (36, रा.कोळीवाडा, अडावद) अशी कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत.
साहेबांच्या नावाने मागितली लाच
चोपडा येथील 32 वर्षीय तक्रारदाराकडे वाळू वाहतूक होवू देण्यासाठी सहा.निरीक्षकांच्या नावाने दरमहा पाच हजारांप्रमाणे आरोपीने लाच मागितली होती मात्र त्यात तडजोड होवून चार हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर तक्रारदाराने तक्रार दिल्याने सापळा रचण्यात आला. दुपारी अडावद पोलीस ठाण्याच्या आवारात होमगार्ड कोळी यांनी लाच स्वीकारताच गोसावी यांनाही अटक करण्यात आली. रविवारी संशयीतांना अमळनेर न्यायालयाने हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. संशयीतांची जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या कस्टडीत रवानगी करण्यात आली आहे. तपास जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील करीत आहेत.








