जामनेरात सशस्त्र दरोडा : कुटूंबाला मारहाण करीत लूट


Armed robbery in Jamner : Family beaten and looted जामनेर : तोंडाला काळे मास्क बांधून आलेल्या दोन सशस्त्र दरोडेखोरांनी वर्धमान नगरातील कुटूंबाला मध्यरात्री चाकूसह लोखंडी रॉड व लाकडी दांड्याने मारहाण करीत सोन्याचे दागिणे लूटल्याची घटना रविवारी पहाटे घडली. या घटनेने शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे दरोडेखोरांनी जाताना लूट केलेल्या घरालादेखील बाहेरून कडी लावली तसेच वरच्या मजल्यावरील दोन्ही बेडरूमलादेखील कड्या लावल्या मात्र कुटुंबाने आरडा-ओरड केल्याने रहिवासी जागे होताच दरोडेखोर धूम पळाले.

सहा ग्रॅमचे मंगळसूत्र लांबवले
पोलिसांनी श्वान पथकासह ठसे तज्ज्ञांना पाचारण करीत तपासाला वेग दिला आहे. वसंत शंकर चव्हाण (बोदवड रोड, वर्धमान नगर, जामनेर, मूळ रा.वसंत नगर तांडा) हे कंत्राटी तत्वावर नगरपालिकेत कर्मचारी असून आपल्या पत्नी कलाबाई, दोन मुले व सुनांसह वास्तव्यास आहेत. शनिवार, 1 एप्रिल रोजी रात्री कुटुंब जेवण करून झोपल्यानंतर मध्यरात्री 12 वाजेनंतर दोन अज्ञात दरोडेखोर तोंडाला काळे मास्क लावून चोरी करण्याच्या उद्देशाने घरात शिरले. घरात शिरण्यापूर्वी दरोडेखोरांनी वरच्या मजल्यावरील दोन्ही रूमला बाहेरून कडी लावली. दरोडेखोरांच्या आवाजाने घरात वसंत चव्हाण यांना जाग आल्यानंतर त्यांनी दरोडेखोरांचा प्रतिकार केल्यानंतर यातील एकाने त्याच्या चाकूने वार करून लोखंडी रॉड डोक्यात टाकला तर त्यांच्या पत्नी कलाबाई याच्या गळ्यातील सहा ग्रॅमची सोन्याची पोत आणि कानातील सोन्याच्या वस्तू जबरीने हिसकावण्यात आल्या. यावेळी आवाज आल्यामुळे शेजारील रहिवासी जागे झाल्याने दरोडेखोरांनी धूम टोकली. या प्रकरणी रविवारी वसंत चव्हाण यांनी जामनेर पोलिसात तक्रार दिल्यानंतर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांकडून पाहणी
पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला तर श्वान पथकाला पाचारण करून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक जयसिंग राठोड करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !