गोंभी जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
रोटरी क्लब भुसावळचा उपक्रम : शैक्षणिक साहित्याने उजळले चेहरे
भुसावळ (शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2026) : रोटरी क्लब भुसावळतर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गोंभी येथील इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय दप्तर (बॅग) तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. गुरुवार, 8 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 12 वाजता शाळेच्या परिसरात हा कार्यक्रम पार पडला. रोटरी क्लब भुसावळचे अध्यक्ष मदनजी बोरकर व सेक्रेटरी गोपीनाथजी अय्यर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उपक्रमासाठी आशिष अग्रवाल यांचे विशेष योगदान लाभले. विद्यार्थ्यांसाठी खाऊची व्यवस्था मंगला पाटील यांनी केली.
यांची होती उपस्थिती
शाळेचे मुख्याध्यापक विजय अशोकराव देवरे व उपशिक्षिका पूर्णिमा रमेश नेमाडे यांनी उपस्थित रोटरी सदस्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. सुनसगाव-गोंभी ग्रुप ग्रामपंचायत गावच्या सरपंच काजल भोजराज कोळी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जितेंद्र लीलाधर कोळी
उपस्थित होते. डॉ.एन.एस.आर्विकर यांनी रोटरी क्लबच्या कार्यपद्धतीविषयी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी पहावीत मोठी स्वप्ने
आशिष अग्रवाल म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन त्यांना शालेय दप्तर देण्याचा उपक्रम राबविता आला, याचा आनंद आहे. विद्यार्थ्यांनी मन लावून शिक्षण घ्यावे, मोठी स्वप्ने पहावीत आणि भविष्यात समाजासाठी उपयुक्त नागरिक बनावे, असे आवाहन त्यांनी केले.
ही तर उज्वल भविष्याला साथ
रोटरी क्लब भुसावळचे अध्यक्ष मदन बोरकर म्हणाले की, समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे ही केवळ मदत नसून त्यांच्या शिक्षणाला आणि उज्ज्वल भविष्यासाठी दिलेली प्रेरणादायी साथ आहे. भविष्यातही अशा प्रकारचे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
यांचे लाभले सहकार्य
दप्तर व खाऊ मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर फुललेले आनंदाने फुलले. या उपक्रमासाठी पीपी एक्झिक्युटिव सेक्रेटरी गजानन ठाकूर, डॉ.एन.एस.आर्विकर, डॉ.माया आर्विकर, महेश भराडे, अनंत पाटील, आशिष अग्रवाल, मंगला पाटील, डॉ.युवराज बढे, अशोक निकम यांचे अनमोल सहकार्य लाभले.


