मध्य रेल्वेची फुकट्या प्रवांशाविरोधात मोठी कारवाई : 20.47 लाख प्रवाशांकडून 159.34 कोटींचा दंड वसूल
भुसावळ विभागाची 38.90 कोटींची विक्रमी वसुली : यंदा दंड वसुलीत 37 टक्के वाढ
भुसावळ (शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2026) : मध्य रेल्वेने विनातिकीट आणि अवैध तिकिटांवर प्रवास करणार्या प्रवाशांविरुद्ध कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. एप्रिल ते सप्टेंबर 2026 या सहा महिन्यांच्या कालावधीत तब्बल 20.47 लाख प्रवाशांना पकडून 159.34 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 116.46 कोटी रुपयांचा दंड वसूल झाला होता त्यामुळे यंदा दंड वसुलीत 37 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदविण्यात आली आहे.
भुसावळ विभागातून 38.90 कोटींची वसुली
मध्य रेल्वेच्या विभागनिहाय आकडेवारीनुसार, मुंबई विभागाने सर्वाधिक 66.92 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्यानंतर भुसावळ विभागाने 3.77 लाख प्रकरणांमधून 38.90 कोटी रुपयांची वसुली केली. पुणे विभागातून 18.68 कोटी, नागपूर विभागातून 17.93 कोटी, सोलापूर विभागातून 7.27 कोटी, तर मध्य रेल्वेच्या मुख्यालयाच्या पथकांनी 9.63 कोटी रुपयांचा दंड वसूल केला. या आकडेवारीवरून भुसावळ विभागातही विनातिकीट आणि अनियमित प्रवासाविरुद्ध व्यापक तपासणी मोहीम राबविली जात असल्याचे स्पष्ट होते.
सप्टेंबरमध्ये 18.53 कोटींचा दंड
सप्टेंबर 2026 या एकाच महिन्यात मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकांनी 2.44 लाख विनातिकीट किंवा अवैध तिकिटांवर प्रवास करणार्या प्रवाशांना पकडले. या कारवाईतून 18.53 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
तिकीट तपासणी मोहिम तीव्र
विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेकडून स्थानकांवरील नियमित तपासणी, अचानक तपासणी, फोर्ट्रेस तपासणी, सखोल तपासणी आणि मेगा तिकीट तपासणी मोहिमा राबविल्या जात आहेत. या मोहिमा मेल व एक्स्प्रेस, पॅसेंजर आणि विशेष गाड्यांसह मुंबई व पुणे विभागांतील उपनगरीय रेल्वे सेवांमध्येही राबविण्यात येत आहेत. विनातिकीट प्रवासासाठी किमान दंडाची रक्कम 250 रुपयांवरून 500 रुपये करण्यात आल्यानंतर तपासणी अधिक तीव्र करण्यात आली आहे. वैध तिकिटाशिवाय प्रवास करणे हा रेल्वे कायद्यानुसार दंडनीय प्रकार असून अशा प्रवाशांवर नियमानुसार कारवाई केली जाते.
वैध तिकीट काढूनच प्रवास करण्याचे आवाहन
विनातिकीट प्रवासामुळे रेल्वेच्या महसुलावर परिणाम होतो. या महसुलाचा उपयोग प्रवाशांच्या सुविधा, सुरक्षा आणि पायाभूत सुविधांच्या सुधारणेसाठी केला जातो. त्यामुळे प्रवाशांनी गैरसोय आणि दंड टाळण्यासाठी योग्य व वैध तिकीट काढूनच प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. विनातिकीट प्रवासाबाबत ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबवित प्रवाशांना सुरक्षित, सुलभ आणि सन्मानजनक प्रवास उपलब्ध करून देण्यावर मध्य रेल्वेने भर दिला आहे.


