भरधाव कारने उडवल्याने जळगावातील वृद्धाचा मृत्यू
An old man in Jalgaon died after being run over by a speeding car जळगाव : घरी जाण्यासाठी रीक्षाची वाट पाहत उभ्या असलेल्या वृद्धाला अज्ञात कारने उडविल्याने वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री 11 वाजता छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील नेक्सा शोरूमसमोर घडली. राजकुमार सोमोमल धामेचा (65, रा. सम्राट कॉलनी) असे मयताचे नाव आहे.
घरी जात असताना मृत्यूने गाठले
राजकुमार धामेचा हे गेल्या 10 वर्षांपासून एमआयडीसीतील बाबा नमकीन येथे नोकरीला होते. मंगळवारी प्रकृती बरी नसल्यामुळे ते रात्री घरी येण्यासाठी नेक्सा शोरूमसमोर रीक्षाची वाट पाहत असतानाच मागून अज्ञात कारने त्यांना जोरदार धडक दिल्याने धामेचा यांचा डोक्याला जबर मार लागल्याने मृत्यू ओढवला. त्यांना वाचविण्यासाठी काही तरुणांनी रुग्णवाहिका व पोलिसांना संपर्क साधला पण, मदत उशिराने मिळाल्यामुळे धामेचा यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. याबाबत एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास हवालदार अल्ताफ पठाण आणि सिध्देश्वर डापकर करीत आहे.
