मोहाडीतील बेपत्ता तरुणाचा अखेर कुजलेला मृतदेहच आढळला
The decomposed body of the missing young man from Mohadi was finally found जळगाव : सावखेडा शिवारातील स्मशानभूमी जवळील पुलाजवळ बुधवारी सकाळी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला असून तो मोहाडी येथील बेपत्ता तरुणाचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. रोहिदास प्रकाश सोनवणे (भील, 35, रा.मोहाडी, ता.जळगाव) असे मयताचे नाव असून रोहिदास हे रविवारपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
संतापात सोडले होते घर
जळगाव तालुक्यातील मोहाडी येथे रोहिदास सोनवणे हे आपल्या कुटुंब्यासह वास्तव्यास होते. रविवारी संतापात रोहिदास हे घरातून निघून गेल्यानंतर त्यांचा शोध सुरू करण्यात आला होता. बुधवारी सकाळच्या सुमारास सोनवणे यांच्या कुटुंबीय सावखेडा शिवारात शोध घेत असताना त्यांना स्मशान भूमीजवळील पुलाजवळ एका पुरुषाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिसून येताच त्यांनी याबाबतची माहिती तालुका पोलिसांना दिली.

पोलिसांची घटनास्थळी धाव…
घटनेची माहिती मिळताच पोलिीस उपनिरीक्षक गणेश सायकर, पोहेकॉ. लीलाधर महाजन, वासुदेव मराठे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. दरम्यान, कुटूंबियांना मृतदेह आढळून आल्यानंतर त्यांनी त्याच्या अंगावरील कपड्यांवरून तो मृतदेह रोहिदास यांचा असल्याचे ओळखले. मयताच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा आणि मुली असा परीवार आहे.