दिड लाखांची लाच घेताना नायब तहसीलदार जाळ्यात : धरणगावात पथकाची झाडाझडती
Naib Tehsildar caught in the net for taking bribe of half a lakh: Team raids in Dharangaon धरणगाव : शेतजमीन अकृषिक जमिनीमध्ये रूपांतरित करण्याकरिता शासकीय फी व्यतिरिक्त एक लाख 42 हजार रूपयांच्या लाचेची स्वतःकरिता व इतर लोकसेवकांकरिता मागणी करून ती रक्कम घेताना ठाण्यातील नायब तहसीलदार वासुदेव बिसन पवार (57) यांना सोमवारी दुपारी ठाणे एसीबीने पकडल्यानंतर त्यांच्या धरणगावस्थित घराची जळगाव एसीबीच्या पथकाने झडती घेतल्यानंतर धरणगावात मोठी खळबळ उडाली.
धरणगावात उडाली खळबळ
33 वर्षीय तक्रारदार यांच्या परीचयाच्या व्यक्तीची शेतजमीन अकृषिक करावयाची होती. त्यासाठी ठाण्यातील निवासी नायब तहसीलदार वासुदेव बिसन पवार (57) यांनी शासकीय फी व्यतिरिक्त एक लाख 42 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने अॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली. प्राप्त तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यानुसार सोमवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास सरकारी पंचासमक्ष निवासी नायब तहसीलदार वासुदेव पवार यांनी तक्रारदाराकडून 1 लाख 42 हजार रूपयाची लाच घेताच पकडण्यात आले. त्यानंतर त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, संशयित आरोपी धरणगाव येथील रहिवाशी असल्यामुळे त्यांच्या गावातील घराची झाडाझडती जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजोग बच्छाव व सहकार्यांनी घेतली. या झडतीत काय आढळले याचा तपशील कळू शकला नाही मात्र या कारवाईने धरणगावात मोठी खळबळ उडाली.
