वाळू माफियांची मुजोरी : तहसीलदारांच्या वाहनाला ट्रॅक्टरची धडक
अमळनेर : वाळू माफियांची मुजोरी दिवसागणिक वाढतच असून तहसीलदारांच्या वाहनालाच वाळूच्या ट्रॅक्टरने धडक दिल्याची घटना गुरुवारी पहाटे तालुक्यातील खरदे ते वासरे रस्त्या दरम्यान घडली. या प्रकरणी मारवड पोलिसात गुन्हा दाखल असून ट्रॅक्टरसह पावणे तीन लाख रुपयांचा माल तसेच आरोपी भीमराव वानखेडे यास अटक करण्यात आली.
वाळू माफियांची वाढली मुजोरी
तहसीलदार मिलिंद वाघ यांच्या आदेशानुसार मंडलाधिकारी भानुदास शिंदे हे तलाठी स्वप्नील कुलकर्णी, गौरव शिरसाठ, केशव यांच्यासह चालक बाळकृष्ण जाधव आदींचे पथकम तहसीलदारांचे वाहन (एम.एच.19 सी.व्ही.418) घेऊन अवैध वाळू वाहतूकदारांविरुद्ध कारवाई करण्यासाठी गलवाडे जैतपीर परीसरात 8 रोजी रात्रीपासून गस्त घालत असताना 9 रोजी पहाटे खरदे ते वासरे रस्त्यावर त्यांना समोरून वाळूने भरलेले ट्रॅक्टर येताना दिसले. त्यांनी ट्रॅक्टर थांबविण्याचा प्रयत्न केला असता ट्रॅक्टर (एम.एच. 19- 807) वरील चालक भीमराव कैलास वानखेडे (रा.चौबारी) याने सरळ तहसीलदारांच्या वाहनांवर ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न केला. यात तहसीलदारांच्या गाडीचे नोठे नुकसान झाले. मंडलाधिकारी शिंदे यांनी मारवड पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून भीमराव वानखेडे गुन्हा दाखल करण्यात आला तसेच ट्रॅक्टर व त्यातील वाळू जप्त करण्यात आली. तपास सहाययक पोलिस निरीक्षक राहुल फुला करीत आहेत.



