गावठी दारूवर कारवाईसाठी आलेल्या चाळीसगावातील सहा.निरीक्षकांसह पोलिसांवर हल्ला
Bullying of illegal business operators : Beating up the police along with six inspectors of Chalisgaon who came for action चाळीसगाव : अवैध धंदे चालकांनी दादागिरी करीत अवैध धंद्यावर कारवाईसाठी आलेल्या चाळीसगाव ग्रामीणच्या सहाय्यक निरीक्षकांसह कर्मचार्यांना चापटा-बुक्क्यांनी मारहाण करीत पंचनामा फाडून अधिकार्यांची नेमप्लेट तोडली. ही धक्कादायक घटना चाळीसगाव तालुक्यातील गुजरदरी येथे रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडली. या प्रकरणी तिघांविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस यंत्रणेवरच हल्ला
चाळीसगाव तालुक्यातील अखेरचे गाव असलेल्या गुजरदरी येथे अवैधरीत्या दारू गाळली जात असल्याची माहिती चाळीसगाव ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर सहाय्यक निरीक्षक धरमसिंग विठ्ठल सुंदरडे हे कर्मचारी व पंचांसह गुजरदरी येथे गोटीराम मोहन चव्हाण यांच्या शेत-शिवारात आले असता कारवाई न करण्यासाठी संशयित लखन सुदाम राठोड, रामेश्वर सुदाम चव्हाण, भास्कर उर्फ पिंटू मोहन चव्हाण (सर्व रा.गुजरदरी) यांनी अधिकारी सुंदरडे यांच्यासह पोलीस कर्मचारी व पंच याना शिवीगाळ करीत चापटांनी मारहाण केली. सुंदरडे यांच्या हातातील पंचनाम्याचा कागद फाडण्यात आला तसेच त्यांची कॉलर पकडून, नेमप्लेट हिसकावण्यात आली. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात धरमसिंग विठ्ठल सुंदरडे यांच्या फिर्यादीवरुन वरील तिघा संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.निरीक्षक कुणाल चव्हाण करीत आहेत.


