यावलला महाविकास आघाडीला मोठा हादरा : बाजार समिती निवडणुकीत महायुतीच्या पॅनलला दणदणीत विजय
Victory of Mahayuti panel in Yaval Bazaar Committee यावल : यावल बाजार समितीच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत
भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीच्या सहकार पॅनलने दणदणीत विजय मिळवला. यंदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शिवसेना व रिपाइंला सोबत घेऊन सहकार पॅनलची निर्मिती केली. मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार लता सोनवणे व युवा नेते अमोल हरीभाऊ जावळे यांनी पॅनलचे नेतृत्व केले. महाविकास आघाडीतर्फे आमदार शिरीष चौधरी यांनी धुरा सांभाळली. महायुतीला यावल येथे 15 जागांवर यश मिळाले असून महाविकास आघाडीला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले.
महाविकास आघाडीला मोठा धक्का
रविवारी सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीला सुरूवात झाली. यात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. महायुतीच्या पॅनलने 18 पैकी तब्बल 15 जागांवर विजय संपादन करून एकहाती वर्चस्व मिळवले असून काही मतदारसंघात पुर्नमोजणी सुरू आहे. महायुतीचे बहुमत निर्विवादपणे प्रस्थापित झाल्याने यावल येथे भाजपा कार्यकर्त्यांनी अमोल जावळे यांना खांद्यावर घेत जल्लोष करण्यास सुरूवात केली आहे.

