भुसावळनजीक विहिरीत पडलेल्या बिबट्याची 12 तासानंतर सुटका : वनविभागाने नैसर्गिक अधिवासात सोडले


Rescue of leopard after 12 hours after falling in well near Bhusawal : Forest department released it in natural habitat  भुसावळ : शिकारीचा पाठलाग करताना बिबट्या कोरड्या विहिरीत पडल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास शहरापासून जवळच व बियाणी मिलिटरी स्कूलजवळील चोरवड शिवारात येणार्‍या एका शेतात घडली. रविवारी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर नागरीकांनी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. वनविभागाला माजी नगरसेवक पिंटू कोठारी यांनी सकाळी माहिती कळवल्यानंतर सुमारे 25 कर्मचार्‍यांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला व दुपारी तीन वाजेच्या सुमारास पथकाने चार तासांच्या परीश्रमानंतर बिबट्याला बाहेर काढण्यात यश मिळवले. नंतर बिबट्याला नैसर्गिक अधिवसात सोडण्यात आले.

कुत्र्यांची शिकार करताना बिबट्या विहिरीत
कुर्‍हा भागात यापूर्वीही बिबट्याचा संचार आढळला असून मध्यरात्री कुत्र्यांची शिकार करण्याच्या प्रयत्नात सुरू असलेल्या पाठलागात मध्यरात्री बिबट्या चोरवड शिवारातील एका कोरड्या विहिरीत कोसळल्याचे सूत्रांनी सांगितले. बियाणी मिलीटरी स्कूलजवळील एका शेतात मध्यरात्री बिबट्या पडल्याची माहिती कळताच मोठ्या संख्येने नागरीकांनी त्यास पाहण्यासाठी गर्दी केली. विहिर खोल असल्याने बिबट्याला बाहेर पडता आले नाही.

12 तासानंतर बिबट्याची सुटका
सहाय्यक वनसंरक्षक उमेश बिराजदार व मुक्ताईनगर वनक्षेत्रपाल क्रृपाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कुर्‍हे वनपाल पी.एम.महाजन, पूर्व वनरक्षक संदीप चौधरी, वनरक्षक पश्चिमचे विलास काळे, मोबाईल स्कॉडचे योगेश दीक्षित, संभाजी पाटील, नवल जाधव, नितीन खंडारे, बी.एन.पाटील, सोनवणे व मुक्ताईनगर वनपरीक्षेत्रातील 15 कर्मचार्‍यांचे पथक रविवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास दाखल झाले मात्र पथकाकडील पिंजरा छोटा असल्याने पुन्हा दुसरा पिंजरा मागवून तो विहिरीत सोडण्यात आला व दुपारी तीन वाजेच्या सुमारास बिबट्याची सुटका (रेस्क्यू) करण्यात यंत्रणेला यश आले. नंतर बिबटयला नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरीत्या सोडण्यात आल्याची माहिती मुक्ताईनगर वनक्षेत्रपाल क्रृपाली शिंदे यांनी दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !