चालकाला मारहाण करीत कन्नड घाटातून दोन कोटींच्या स्क्रॅप मालासह ट्रक लांबवला : दोघांना अटक
Truck with scrap goods worth 2 crores removed from Kannada Ghat by beating the driver : Two arrested चाळीसगाव : सुमारे दोन कोटी रुपये किंमतीच्या कॉपर स्क्रॅपची वाहतूक करणार्या ट्रक चालकाला अडवत मारहाण करीत ट्रक लांबवण्यात आल्याची घटना 30 एप्रिल रोजी दुपारी दिड वाजेच्या सुमारास घडली होती. अपहरण करण्यात आलेल्या चालकाला धुळ्यातील मोहाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चाळीसगाव-धुळे रोडवरील गरताड गावाच्या सुतगिरणीसमोर फेकून देण्यात आले होते. चालकाने सुटका करीत मोहाडी पोलीस ठाणे गाठत घडलेला प्रकार कथन केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला व गुन्ह्याची सुरवात कन्नड घाटाच्या पायथ्याशी झाल्याने हा गुन्हा चाळीसगाव ग्रामीण पोलिसात वर्ग करण्यात आला. दरम्यान, या गुन्ह्यातील दोन संशयीतांना अटक करण्यात आली आहे. सोमवीर रामफलसिंग जाट (35, भाली आनंदपूर, रोहतक हरियाणा) आणि नुर मोहंमद युनूस कक्कल (31, जामनगर गुजरात) अशी अटकेतील आरोपींची नावे आहे.
मारहाण करीत लांबवला ट्रक
आसाम राज्यातील लखींदर जोधू बोरा (30, गुमिनीपुंडी, तिरूवलूर, तामिळनाडू) हा तरुण जी.जे.10 झेड.7792 क्रमांकाच्या ट्रकमध्ये सुमारे एक कोटी 91 लाख रुपये किंमतीचे कॉपर स्क्रॅप घेवून निघाल्यानंतर चाळीसगावजवळील कन्नड घाटाच्या पायथ्याशी संशयित सोमवीर रामफलसिंग जाट, नुर मोहंमद कक्कल, मामू (रा.डिसा, गुजरात), व चार अनोळखी इसमांनी लखींदर जोधू बोरा याच्या ताब्यातील ट्रकमधे चढून त्याच्या नाकातोंडावर हाता-बुक्क्यांनी मारहाण करीत चालकाचे हातपाय दोराने बांधून त्याला ट्रकमधेच डांबून ठेवत धुळ्यातील मोहाडी नगर पोली स्टेशन हद्दीत चाळीसगाव ते धुळे रस्त्यावर गरताड गावाजवळील सूतगिरणीजवळ फेकून दिले व त्यानंतर ट्रक लांबवला होता. ट्रक चालकाने सुका केल्यानंतर मोहाडी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हा गुन्हा चाळीसगाव ग्रामीण पोलिसात वर्ग करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव करीत आहेत.


