धावत्या रेल्वेतून तोल जावून पडल्याने अनोळखी तरुणाचा मृत्यू
Unidentified youth dies after falling off balance from running train जळगाव : कुठल्यातरी धावत्या रेल्वेतून पडल्याने 40 वर्षीय अनोळखी तरुण गंभीर जखमी झाला होता. ही घटना बुधवार, 3 मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली होती. जखमी तरुणावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी गुरूवारी सकाळी नऊ वाजता जळगाव लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
अनोळखीची ओळख पटवण्याचे आवाहन
जळगाव-आसोदा दरम्यान असलेल्या आसोदा रेल्वे गेटजवळ बुधवार, 3 मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास जळगावकडून भुसावळकडे जाणार्या धावत्या रेल्वेतून अंदाजे 40 वर्षीय अनोळखी तरुण खाली पडल्याची घटना समोर आली होती. यावेळी तरुण जखमी अवस्थेत पडून आल्याची माहिती रेल्वे कर्मचारी सुभाष सपकाळे आणि विकासकुमार यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने आसोदा गावातील गिरीष प्रदीप चिरमाडे आणि निखील भानूदास चिरमाडे यांच्या मदतीने खाजगी वाहनातून तरुणाला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. उपचार सुरू असताना गुरूवार, 4 मे रोजी सकाळी तरुणाची प्राणज्योत मालविली. या प्रकरणी जळगाव लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


