महामार्ग रूंदीकरणात दीनदयाल नगरातील घरे हटणार
पोलिसांच्या निगराणीत महामार्ग प्राधिकरणाकडून मोजमाप पूर्ण
भुसावळ : शहराला लागून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे रूंदीकरणाचे काम झपाट्याने सुरू असून पोलिस प्रशासनाच्या बंदोबस्तात महामार्ग प्राधिकरणाकडून मंगळवारी दीनदयाल नगरातील सुमारे 99 घरांवर रंगाने निशाणी लावण्यात आली. 99 पैकी 89 घरांच्या मालकांना आतापर्यंत मोबदला मिळालेला असून अन्य नागरीकांनाही मोबदला मिळण्यासंदर्भात प्रशासनाची चर्चा सुरू आहे. दरम्यान, गुरुवारी सकाळपासून तगड्या बंदोबस्तात अत्याधूनिक यंत्र सामुग्रीने 99 घरे पाडण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
भुसावळात फोरवेच्या कामाला गती
भुसावळातून गेलेल्या फोरवेच्या कामाला मोठ्या प्रमाणावर गती आली आहे. नाहाटा महाविद्यालयासमोरील दिनदयाल नगरातील 99 घरे हटवून या जागेवरून रस्ता जाणार असल्याने मंगळवारी पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरे, गोपनीय विभागातील सचिन पोळ, आरसीपी प्लॉटून, बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी, डीबी कर्मचार्यांच्या बंदोबस्तात महामार्ग प्राधीकरण विभागाच्या अधिकार्यांनी मोजणी करून मार्किंग केले. रस्ता चौपदरीकरणा नाहाटा चौफुलीजवळील ही घरे सर्व काढली जाणार असून हा मार्ग मोठ्या प्रमाणावर मोकळा होऊन चौक मोठा होणार असल्याने वाहतूक प्रश्नही सुटणार आहे.

गुरुवारी बंदोबस्तात पाडली जाणार घरे
गुरूवार, 16 रोजी सकाळी सातपासूनच राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण विभागातर्फेअत्याधूनिक यंत्र सामुग्रीद्वारे घरे जमीनदोस्त केली जाणार आहेत. भुसावळ विभागातून त्यासाठी मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. दरम्यान, घरे पाडली जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मोबदला मिळालेल्या नागरीकांनी आतापासून घरे रीकामी करण्यास सुरूवात केली आहे.


