केळीच्या पिकात म्हशी चारल्यातून वाद 33 वर्षीय तरूणावर विळ्याने वार


A 33-year-old youth was stabbed with a sickle in a dispute over buffalo grazing in the banana crop यावल : तालुक्यातील डोंगरकोठारा येथे एका 33 वर्षीय तरुणाने म्हशी केळीच्या पिकात चारल्याचा राग येऊन एकाने त्याच्यावर विळ्याने वार केला. यात तरुणाच्या गुप्तांगावर जबर दुखापत झाली. तरुणास गंभीर जखमी अवस्थेत यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले मात्र त्याची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्याला तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

तरुणाची प्रकृती अत्यवस्थ
डोंगरकठोरा, ता.यावल या गावातील रहिवासी चंद्रकांत बळीराम सपकाळे (33) हा तरूण शुक्रवारी गावालगतच असलेल्या पितांबर केशव आढाळे यांच्या शेत-शिवारात म्हशी चारत होता. दरम्यान त्या म्हशी केळीच्या पत्ती व पिलबागमध्ये शिरल्या. याचा राग येवून पितांबर आढळे यांनी संतापात चंद्रकांत सपकाळे याच्यावर विळ्याने (बख्खी) त्याच्या गुप्तांगावर वार करून जबर दुखापत केली. शेतात रक्तबंबाळ अवस्थेत चंद्रकांत सपकाळे कोसळला. ही घटना गावात कळल्यावर त्याला तातडीने तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. या ठिकाणी डॉ.प्रशांत जावळे, अधिपरीचारीका दीपाली किरंगे, संजय जेधे यांनी त्याच्यावर प्रथमोपचार केले मात्र त्याची प्रकृती खूपच गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले.

या संशयिताविरोधात गुन्हा
या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सुनंदाबाई बळीराम सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पितांबर केशव आढाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास यावलचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप सूर्यवंशी करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !