विद्युत खांबावरील फांदी हटवताना शॉक लागल्याने रीधूरीतील 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू


An 18-year-old youth from Ridhuri died due to shock while removing a branch from an electric pole यावल : तालुक्यातील रीधुरी या गावात वादळ वार्‍यात शेत-शिवारात अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या व झाडे कोसळली. विद्युत खांबावर पडलेली फांदी काढताना विद्युत शॉक लागून 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री घडली. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. रीधुरी गावातील रहिवासी लोकेश नारायण सोनवणे (18) हा तरुण रोजंदारीवर विद्युत वितरणकडे कामाला होता.

फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
बुधवारी गावात वादळी वार्‍यासह पाऊस झाला व गावालगत असलेल्या प्रकाश सोनवणे यांच्या शेतात वादळ वार्‍यात झाडांच्या फांद्या विद्युत तारांवर पडल्याने फांदी हटवण्याचे काम तरुणास सांगण्यात आले. खांबावर पडलेली फांदी हटवतांना या तरुणास जबर विद्युत शॉक लागला आणि तो जमिनीवर कोसळला. तेथून त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असता डॉ.मोहिनी भुगवाड्या यांनी तपासणी करून मृत घोषित केले. या प्रकरणी ईश्वर सोनवणे यांनी दिलेल्या खबरीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास फैजपूरचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अनिल पाटील, भूषण ठाकरे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !