रावेर परीसराला वादळी पावसाचा तडाखा : केळीचे कोट्यवधींचे नुकसान ; 27 घरांची पडझड
Stormy rains hit Raver Area : loss of crores of Bananas ; Collapse of 27 Houses रावेर : शहरासह परीसरात गुरुवारी रात्री वेगवान वादळी पावसामुळे सर्वाधिक मोठा फटका केळी पिकाला बसला आहे. वादळाने अनेक ठिकाणी वीज खांब पडल्याने वीज तारा तुटून वीजपुरवठा खंडित झाला तर रावेर तालुक्यात 227 घरांची पडझड झाली आहे. वादळात एक म्हैस आणि दोन गायी मृत पावल्या असून रावेर तहसीलदार बंडू कापसे यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
शहरात तुटले वीज खांब
गुरुवारी सकाळपासूनच प्रचंड उकाडा होत होता. दुपारी तीन वाजता पावसाचा शिडकावा झाला मात्र संध्याकाळी साडेसात वाजता वादळी पावसाला सुरूवात झाली. या वादळामुळे शहरातील अष्टविनायक नगर, नागझिरी, सावदा रोड, बर्हाणपूर रोड या सहा भागातील विजेचे खांब तुटले. खांब पडल्याने तारा तुटल्याने शहरातील विविध भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला. शहर अंधारात बुडाले. महावितरणकडून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असून काही भागात वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश आले आहे.
227 घरांची पडझड
प्रशासनाच्या माहितीनुसार वादळी पावसामुळे रावेर परीसरातील घरांवरील पत्रे उडाली. प्रशासनाच्या माहितीनुसार रावेर शहरात 120, रमजीपुर 25, बक्षीपूर 31, शिंदखेड 15, खानापूर एक, पिंप्री 10, अहिरवाडी 10, केर्हाळा खुर्द पाच, जुनोने दोन, कर्जोद पाच अशा एकूण दहा गावातील 227 घरांची पडझड झाली. घरे पडल्याने नागरीक आता उघड्यावर आले असून त्यांना तातडीची मदत देण्याची अपेक्षा आहे.
बाराशे हेक्टरवरील केळीचे नुकसान
जोरदार पाऊस आणि वादळाने तालुक्यातील मुंजलवाडी, बक्षीपूर, शिंदखेडा पिंप्री यासह सुमारे दहा ते पंधरा गावातील शेत- शिवारातील केळी पिकाला जोरदार तडाखा दिल्याने शेतकर्यांचे नुकसान प्रचंड नुकसान झाले. कापणीला आलेली केळी पडल्याने केळीचे नुकसान झाले तर सूत्रांच्या माहितीनुसार 22 गावातील एक हजार 652 केळी उत्पादकांचे एक हजार 252 हेक्टरवरील केळीचे कोट्यवधींचे नुकसान झाले. रावेर तहसीलदार बंडू कापसे यांनी वादळग्रस्त जाऊन नुकसानीची पाहणी केली. पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
झाडे पडल्याने वाहतूक बंद
जोरदार वादळाने रावेर पाल रस्त्यावरील शिंदखेडा मुंजलवाडी कुसुंबा दरम्यान अनेक झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक बंद झाली. शुक्रवारी सकाळपासून रस्त्यावरील पडलेले झाडे हटवून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. रावेर-सावदा रोडवरील पटेल एजन्सीजवळ खांब रस्त्यावर आडवा पडल्याने बर्हाणपूरकडून येणारी व जाणारी वाहतूक ठप्प झाली.
