यावल येथे अंकलेश्वर-बर्हाणपूर राज्य मार्गाच्या दुरुस्तीसाठी मनसेकडून रस्ता रोको आंदोलन
Road stop movement by MNS for the repair of Ankleshwar-Berhanpur state road at Yaval यावल : अंकलेश्वर-बर्हाणपूर राज्य मार्गाची दयनीय अवस्था झाल्याने व यावलपासून चोपड्यापर्यंतचा रस्ता खड्डेमय झाल्याने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती व्हावी यासाठी मनसेकडून सोमवारी सकाळी 11 वाजता रास्तारोको आंदोलन करण्यात आले. शहरातील चोपडा रस्त्यावरील वनविभागाच्या कार्यालयाजवळ सकाळी 11 वाजेला रास्तारोको आंदोलनाला सुरवात झाली.
रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष
यावल शहरातून अंकलेश्वर-बर्हाणपूर राज्य मार्ग जातो. हा रस्ता यावलपासून ते चोपड्यापर्यंत मोठ्या प्रमाणावर नादुरुस्त झाला आहे. ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले असून या रस्त्याचे हस्तांतरण केंद्रीय मार्गाकडे झाले असतानाही रस्त्याच्या दुरुस्तीकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे. हा रस्ता तातडीने दुरुस्त व्हावा म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सोमवारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. चोपडा रस्त्यावर विरावली फाट्याजवळील वनविभागाच्या कार्यालयासमोर सोमवारी सकाळी 11 वाजता आंदोलनाला सुरवात झाली. यात दोन्ही बाजुने मोठ्या संख्येत वाहनांच्या रांगा लागल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित जिल्हाध्यक्ष चेतन आढळकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच रीक्षा व टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या पदाधिकार्यांच्या सहभागाने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. पोलीस प्रशासनासह सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून या रस्त्या संदर्भात कार्यालयीन पत्रव्यवहार करून रस्ता दुरूस्तीचे प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
यांचा आंदोलनात सहभाग
या आंदोलनात मनसेचे जनहित जिल्हाध्यक्ष चेतन आढळकर, सह उपजिल्हाध्यक्ष अजय तायडे, तालुकाध्यक्ष किशोर नन्नवरे, शहराध्यक्ष गौरव कोळी, कुणाल बारी, उपजिल्हाध्यक्ष जळगाव राजेंद्र निकम, निलेश खैरनार, विकास पाथरे, शुभम पाटील, प्रमोद रुले, संजय शिंपी, पवन पवार व पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले. आंदोलनादरम्यान पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोदकुमार गोसावीसह कर्मचार्यांनी चोख बंदोबस्त राखला.
