बोरखेडा हत्याकांड प्रकरण : तत्कालीन अधिकार्यांसह पाच जणांची सरतपासणी
Borkheda massacre case : Cross-examination of five persons including then officials
भुसावळ : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून चौघा भावंडाची हत्या करण्यात आल्याची घटना रावेर तालुक्यातील बोरखेडा शिवारात 15 ऑक्टोबर 2020 रोजी घडली होती. या हत्याकांड प्रकरणी महेंद्र सीताराम बारेला यास अटक केल्यानंतर हत्याकांडाच्या नियमित सुनावण भुसावळ सत्र न्यायालयात सुरू झाली आहे. सोमवारी या खटल्यात तत्कालीन तपासाधिकार्यांसह डीएनए घेणार्या डॉक्टरांसह पाच जणांची सरतपासणी तसेच उलटतपासणी विशेष न्यायालयाचे न्या.आर.एम.जाधव यांच्या न्यायासनापुढे घेण्यात आली.
हत्याकांड प्रकरणात पाच जणांची सरतपासणी
रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे 15 ऑक्टोबर 2020 या दिवशी रात्री शेतात दोन मुले, दोन मुली अशांची हत्या करण्यात आली होती. हत्येपूर्वी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला व त्याचवेळी अन्य भावंडांना जाग आल्याने त्यांचीदेखील हत्या करण्यात आली. या हत्याकांडाची भुसावळ सत्र न्यायालयात नियमित सुनावणी सुरू झाली आहे. सोमवार, 19 जून रोजी खटल्याचे तपासाधिकारी व तत्कालीन पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, तत्कालीन सहायक निरीक्षक शीतलकुमार नाईक, डीएनए सॅम्पल घेणारे डॉ.संजय पाटील, संशयिताचे वडिल सीताराम बारेला तसेच आरोपीने वापरलेल्या सीमकार्ड मालकाची सरतपासणी विशेष सरकारी वकील अॅड.उज्वल निकम यांनी घेतली तर संशयितातर्फे अॅड.सत्यनारायण पाल यांनी उलट तपासणी घेतली.
14 जुलैला पुन्हा उलट सरतपासणी
14 जुलै रोजी या खटल्यात सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंता तसेच शवविच्छेदन करणार्या डॉक्टरांची सरतपासणी घेतली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
