साहित्यीक चळवळीला व समाजाला नवी दिशा देतात : जयसिंग वाघ


भुसावळ : साहित्यीक हे देशातील जवाबदारी नागरीक असून ते समाजास, चळवळीस एवढेच नाही तर देशाला दिशा देण्याचे अत्यंत महत्वपूर्ण काम करतात, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यीक व विचारवंत जयसिंग वाघ यांनी येथे केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात आर.पी.आय.चे जिल्हा नेते तथा प्रसिद्ध विद्रोही कवी दिवंगत अनिल इंगळे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त आयोजित श्रद्धांजली सभेत प्रमुख वक्ता म्हणून भाषण करतांना वाघ बोलत होते.

भाकड कथेमुळे युवक सैरभैर
जयसिंग वाघ म्हणाले की, अनिल इंगळे यांनी 25 वर्षे सलग साहित्य संमेलनांचे आयोजन केले. फुले आंबेडकर यांचे विचार महाराष्ट्रभर नेले, अनेक दिग्गज साहित्यीक, कलावंत, गायक, गीतकार त्यांनी या माध्यमातून भुसावळ येथे निमंत्रीत केले मात्र अलिकडे काही साहित्यीक आपली जबाबदारी विसरून सवंग व प्रसिद्धीलोलुप लिखाण करीत आहेत. साहित्यीक अधिक कल्पनाविलासी नसावा तो कल्पनाविलासी असल्यास काल्पनीक कथा, भाकड कथा जन्माला येतात त्यातून समाजास योग्य दिशा मिळत नाही व प्रसंगी युवक हा सैरभैर होतो, असेही ते म्हणाले.

अध्यक्षस्थानी कवी अशोक सर्वटकर होते. त्यांनी अनिल इंगळे यांच्या राजकीय कार्याची माहिती देऊन त्यांचा धाडसीपणा स्पष्ट केला. याप्रसंगी कामगार नेते अरुण दामोदर यांनी अनिल इंगळे यांच्या राजकीय, सामाजिक, साहित्यीक कार्याची माहिती देऊन त्यांनी अपंग, भिकारी, वेश्या यांच्या करीता केलेला संघर्ष मांडला. रीपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष विजय साळवे यांनी सांगितले की, इंगळे हे लढाऊ तर होतेच तसेच ते अभ्यासू होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले त्यांचे आदर्श होते, त्यांनी अतिशय विद्रोही भूमिकेतून आपले विचार मांडले. नरेश गडवे, पप्पूभाई सुरडकर, सुनील ढीवरे, डॉ.इम्रान, बालू सोनवणे, सुनील आराक यांचीही भाषणे झाली. मुख्य संयोजक तथा राष्ट्रीय दलित पँथरचे उपाध्यक्ष सिद्धार्थ सोनवणे यांनी अत्यंत विस्तृतरीत्या भूमिका मांडून अनिल इंगळे यांच्या जीवन कार्याचा धावता आढावा मांडला. त्यांचे कार्य पुढे नेण्याचा संकल्प केला तसेच महाराष्ट्र दलित साहित्य अकादमीतर्फे साहित्य चळवळ अधिक गतिमान करुन पुढील साहित्य संमेलनांचे आयोजन करणे कामी लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही सिद्धार्थ सोनवणे यांनी स्पष्ट केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !