भुसावळसह जळगावातील कुविख्यात गुन्हेगार स्थानबद्ध
गुन्हेगारी वर्तुळात खळबळ : पोलिसांच्या प्रस्तावानंतर जिल्हाधिकार्यांचे आदेश
Bhusawal along with two in Jalgaon stationed: Collector’s orders भुसावळ : सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्यांविरोधात नूतन पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या आदेशानुसार यंत्रणेने कारवाईचा जोरदार सपाटा सुरू केला आहे. आतापर्यंत 20 गुन्हेगारांवर एमपीडीएची कारवाई करण्यात आली असताना आता भुसावळ व जळगाव शहरातील कुविख्यात असलेल्या दोघांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रकाश चंद्रकांत कंजर (34, खंडेराव नगर जळगाव) व सोनू रामेश्वर पांडे (28, मामाजी टाकी मागे, भुसावळ) अशी स्थानबद्ध झालेल्यांची नावे असून त्यांची अनुक्रमे ठाणे व येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. दरम्यान, आगामी काळात भुसावळातील अनेक गुन्हेगारांवर हद्दपारी तसेच एमपीडीएची कारवाई होणार असल्याचे खास सूत्रांनी सांगितले.

संशयितांची गुन्हेगारी पार्श्वभूमी
जळगावच्या खंडेराव नगरातील प्रकाश कंजर हा अवैधरीत्या हातभट्टीची दारू तयार करून त्याची विक्री करीत असल्याने त्याच्यावर आतापर्यंत एकूण आठ गुन्हे दाखल होते तर भुसावळातील सोनू पांडे याच्यावर घरफोडी, जबरी चोरी, शिविगाळ करून धमकी देणे असे सहा गुन्हे दाखल होते.
नूतन पोलीस उपअधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सादर झाला प्रस्ताव
सोनू पांडेबाबतचा प्रस्ताव भुसावळचे नूतन पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ शहरचे निरीक्षक गजानन पडघण यांनी सादर केला तर प्रकाश कंजरचा प्रस्ताव रामानंद निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करून तो गुन्हे शाखा निरीक्षक किसनराव नजन पाटील व सहकार्यांच्या माध्यमातून जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्याकडे सादर करण्यात आला. यंत्रणेने प्रस्तावाची पडताळणी केल्यानंतर दोन्ही प्रस्ताव जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्याकडे सादर केल्यानंतर दोघांविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाईचे आदेश पारीत करण्यात आले.
आतापर्यंत 20 उपद्रवींवर कारवाई
एमपीडीए कायद्यांतर्गत नोव्हेंबर 2022 पासून आजपावेतो गंभीर गुन्हे दाखल असलेले एकूण 20 गुन्हेगारांवर धोकादायक व्यक्ती, हातभट्टीवाले व वाळू तस्कर या नियमाखाली नागपूर, अमरावती, ठाणे, नाशिक, येरवडा या मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईचा गुन्हेगारांनी चांगलाच धसका घेतला आहे.