भुसावळ शहरातील महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी अंडरपास 10 जुलैपर्यंत खुला करा
जिल्हाधिकार्यांच्या सूचना : 30 जुलैपर्यंत महामार्गावरील सर्विस रोड पूर्ण होणार
Open the underpass till July 10 to prevent accidents on highways in Bhusawal city
भुसावळ : शहरातील महामार्गाला लागून असलेल्या वांजोळा रस्त्यावर दोन दिवसांपूर्वी झालेल्या ट्रक अपघातात पित्याचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. आमदार संजय सावकारे यांनी या संदर्भात रास्ता रोको करीत प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर जिलधिकार्यांनी शुक्रवारी बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. ठरल्यानुसार जिल्हाधिकार्यांच्या उपस्थितीत सुरक्षा समितीची खासदार व आमदारांच्या उपस्थितीत शुक्रवारी प्रांताधिकारी कार्यालयात बैठक झाली. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी 30 जुलैपर्यंत राष्ट्रीय महामार्गावरील सर्विस रोडचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्याच्या सूचना केल्या तर 10 जुलैपर्यंत अंडरपास (बोगदा) दुचाकी वाहतुकीसाठी खुला करण्याचे निर्देश दिले. यावेळी अधिकारी व लोकप्रतिनिधींनी अंडरपासची पाहणीदेखील केली.
प्रांताधिकारी कार्यालयात बैठक
बुधवार, 26 रोजी झालेल्या अपघातात प्रमोद झोपे यांचा मृत्यू झाला तर त्याचा मुलगा जखमी झाला होता. अपघातानंतर आंदोलन झाल्यानंतर जिल्हाधिकार्यांनी शुक्रवारी या संदर्भात प्रांत कार्यालयात रस्ता सुरक्षा समितीची खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, मुख्याधिकारी महेश वाघमोडे, उपप्रादेशिक परीवहन अधिकारी (आरटीओ) श्याम लोही, प्रभारी तहसीलदार अंगद आसटकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रीकुमार चिंचकर, महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी अभिजीत पवार, शैलेंद्र आवारे आदी अधिकार्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली.

अंडरपासची अधिकार्यांकडून पाहणी
महामार्गावर तयार करण्यात आलेला मात्र दोन वर्षांपासून बंद असलेला अंडरपासची अधिकारी व लोकप्रतिनिधींनी बैठकीनंतर पाहणी केली. प्रत्यक्ष बोगदा पाहून बोगदा सुरू करण्याच्या सूचना करीत महामार्ग ओलांडू नये यासाठी महामार्गावर बॅरेकेटींग करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मित्तल यांनी दिल्या. यावेळी अन्य बोगद्यांची सुध्दा त्यांनी पाहणी केली. बोगदा येत्या 10 दिवसात सुरू करण्याचे निर्देश त्यांनी देत महामार्गावर साईडला काच लावा (आरसा) ज्यात मागील बाजूने काय येत आहे, हे स्पष्ट दिसू शकेल, असेही ते म्हणाले. महामार्गावर वृक्ष लागवड करावी तसेच महामार्गावर लावण्यात येत असलेले बल्कर चालकांवर धडक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी आरटीओ विभागाला दिले.
आमदारांनी सर्व्हिस रोडबाबत मांडला आढावा
वांजोळा रस्त्यावरील अंडरपाससह खडका रोडवरील पेट्रोल पंपासमोर तसेच तळवेलजवळ सर्व्हिस रस्त्याचे अपूर्ण असलेले काम करावे तसेच अंडरपासखाली लाईट लावण्याच्या सूचना आमदार संजय सावकारे यांनी बैठकीत दिल्या. नशिराबाद टोल नाक्यावर 15 दिवसांसाठीच पास मिळत असल्याची त्यांनी सांगून 15 तारखेनंतर पास काढल्यास ती पुढील 15 पर्यंत चालणे अपेक्षित असल्याचे सांगितल्यानंतर जिल्हाधिकार्यांनी संबंधित विभागाला यात लक्ष घालण्याचे सूचित केले.
