पिंप्राळ्यात चाकूहल्ला करीत संशयिताचे मोबाईल घेवून पलायन
In Pimpralay, the suspect escaped with a knife attack with his mobile phone जळगाव : घरासमोर पडलेल्या वाळूच्या ढिगार्यावर का बसले आहेत? अशी विचारणा केल्याच्या रागातून संशयितांनी शिविगाळ करीत धारदार शस्त्राने फिर्यादीच्या मांडीवर जखम केली तसेच 15 हजार रुपये किंमतीचे मोबाईल घेवून पलायन केल्याची घटना शनिवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अज्ञात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. निलेश लक्ष्मीनारायण दुबे (41, रा.पिंप्राळा) असे जखमीचे नाव आहे.
अशी घडली घटना
निलेश दुबे हे पिंप्राळा येथे कुटूंबियांसह वास्तव्यास आहे. शनिवारी रात्री ते फुले मार्केट येथे खरेदीला गेले होते. रात्री 9.30 वाजता कुटूंबासह घरी परतल्यावर त्यांना घराच्या बाहेर वाळूच्या ढिगार्यावर तीन अज्ञात तरूण बसलेले दिसून आले. तुम्ही कोण आहात, इथे का थांबले आहे, अशी विचारणा करून निलेश हे घरामध्ये गेले. तेव्हा तिघांमधील एकाने त्यांना बाहेर बोलावून तू आम्हाला का बोलला? असे म्हणत वाद घातला. इतर दोघांनी निलेश यांना पकडून मारहाण करण्यास सुरूवात केली. तेव्हढ्यात एकाने चाकू काढून निलेश यांच्या पायावर वार करून खिश्यातील 15 हजार रूपये किंमतीचा मोबाईल हिसकावला तर आरडा-ओरड झाल्याने तिघांनी तेथून पळ काढला. लागलीच निलेश यांच्यासह कुटूंबियांनी पोलीस ठाणे गाठले. अज्ञात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक प्रदीप बोरूडे करीत आहेत.


