फुलगाव शिवारात परप्रांतीय तरुणाचा खून ; चौघा संशयितांना न्यायालयाने सुनावली पाच दिवसांची पोलीस कोठडी
इलेक्ट्रीक वायर्स चोरीचा संशय बेतला जीवावर : शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे कारण स्पष्ट
Murder of migrant youth in Phulgaon Shivara; The four suspects were remanded in police custody for five days भुसावळ : भुसावळ तालुक्यातील फुलगाव शिवारात शेतातील इलेक्ट्रीक वायर्स चोरीच्या संशयातून शेतकर्यांनी बेदम मारहाण केल्याने परप्रांतीय 20 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. शेतकर्यांनी प्रकरण अंगलट न येण्यासाठी मयताचे कपडे काढून मृतदेह हलवला मात्र वरणगाव पोलीस व जळगाव गुन्हे शाखेने संयुक्त कारवाईत या गुन्ह्याची उकल करीत फुलगावच्या चौघा शेतकर्यांना बेड्या ठोकल्या. संशयिताना सोमवारी भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पंकज रामचंद्र सोनवणे (20, धामणगाव, ता.शहापूर, जि.बर्हाणपूर, मध्यप्रदेश) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
असे आहे नेमके खुनाचे प्रकरण
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, फुलगाव शिवारातील संशयित आरोपी असलेल्या शेतकर्यांच्या शेतात संशयित तथा मयत पंकज सोनवणे हा मंगळवार, 27 जून रोजी रात्री इलेक्ट्रीक वायर्स चोरताना शेतकर्यांच्या निदर्शनास आल्यानंतर शेतकर्यांनी त्यास हटकत लाठ्या-काठ्यांनी तसेच हाताच्या बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत पंकज सोनवणे याचा मृत्यू ओढवल्याने शेतकर्यांनी प्रकरण अंगलट नको म्हणून मयताचे कपडे अंगावरून काढले तसेच लाठ्या-काठ्यांची विल्हेवाट लावली. दुसर्या दिवशी बुधवारी सकाळी साडेसात वाजता फुलगाव शिवारातील पिंप्रीसेकम रोडवरील अविनाश पुंडलिक पाटील यांच्या शेत गट क्रमांक 297/01 मधील शेतात मृतदेह आढळल्याची माहिती वरणगाव पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी सुरूवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली व तपासाला गती दिली.
ओळख पटली ; खुनाचा उलगडा
सुरूवातीला अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची नोंद करीत गुन्हे शाखा व वरणगाव पोलिसांनी संयुक्त चक्रे फिरवत मयत हा पंकज सोनवणे असल्याची ओळख पटवली तर शवविच्छेदन अहवालातही मारहाण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पथकाने फुलगावातील शेतकर्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. संशयित चोरी करण्यासाठी आल्यानंतर त्यास मारहाण करण्यात आल्यानंतर हा प्रकार घडल्याचे समोर आले.
चौघा शेतकर्यांना अटक
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक परशुराम बाबासाहेब दळवी यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी विजय सुधाकर चौधरी (40), संतोष मुरलिधर कोलते (52)ख अविनाश पुंडलिक पाटील (54), सुपडू उर्फ नरेंद्र यशवंत चौधरी (45, फुलगाव, ता.भुसावळ) यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. ही कारवाई जळगाव गुन्हे शाखा निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांच्या पथकातील उपनिरीक्षक गणेश वाघमारेख प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, नंदलाल पाटील, कमलाबर बागुल, अनिल देशमुख, रणजीत जाधव, श्रीकृष्ण देशमुख, दीपक पाटील तसेच वरणगावचे सहाय्यक निरीक्षक आशिषकुमार अडसुळ, पोलीस उपनिरीक्षक परशुराम बाबासाहेब दळवी, नाईक अतुल बोदडे कॉन्स्टेबल सुखराम सावकारे आदींच्या पथकाने केली.
