जळगावात पॉलिश करण्याच्या बहाण्याने सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने लांबविले
जळगाव : सोन्या-चांदीच्या दागिन्यांना पॉलीश करण्याचा बहाणा करून दोन अज्ञात भामट्यांनी ईश्वर कॉलनीतील 65 वर्षीय वृध्द महिलेचे एक लाख 25 हजारांचे दागिने हातचलाखीने लांबवले. याप्रकरणी बुधवार, 5 जुलै रोजी दुपारी 3 वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे फसवणूक प्रकरण
जळगाव शहरातील ईश्वर कॉलनी परीसरात मुन्नीदेवी मोहनलाल वर्मा (65) या दिराणी बायादेवी उदयराज वर्मा यांच्यासोबत वास्तव्याला आहे. मंगळवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास दोन्ही वृध्द महिला घरी असतांना दोन अज्ञात व्यक्ती आले. आम्ही कंपनीचे सेल्समन असून आम्ही पावडर विक्री करत असल्याचे सांगितले. तुम्ही घरातील खराब पितळी व तांब्याचे भांडे असतील तर आमच्याकडील पावडरने साफ करून देतो म्हणून त्यांनी विश्वास संपादन करीत तांब्या दिल्यानंतर त्याला चमकावून दिल्यानंतर संशयितांनी दागिने देखील उजळवून देतो म्हणून सांगितल्याने वृध्द महिलेने सुरूवातील दोन चांदीचे कमरपट्टे दिले. भामट्यांनी दोन्ही कमरपट्टे चमकवून दिले त्यामुळे वृध्द महिलेचा दोघांवर विश्वास बसला आणि त्यांच्याजवळील दोन सोन्याच्या अंगठ्या आणि सोन्याच्या कानातील रींगा काढून दिल्या. दोघांनी एका पातेल्यात हळद व लालसर रंगाची पावडर टाकून दागिने गॅसवर ठेवण्यास सांगितले. त्यानंतर थंड झाल्यावर काढून घ्या, असे सांगून त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने हातचालाखीने चोरून धुम ठोकली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वृध्द महिलेने बुधवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी करीत आहे.


