कंडारी गावातील युवकाचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
A young man’s body was found in a rotten state in Kandari village जळगाव : जळगाव तालुक्यातील कंडारी येथील 24 वर्षीय युवकाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. राहुल युवराज भील (24, कंडारी, ता.जळगाव) असे मयताचे नाव आहे.
शोध सुरू असतानाच आढळला मृतदेह
जळगाव तालुक्यातील रायपूर कुसुंबा येथे मयत राहुल भील हा वडीलांसोबत वास्तव्याला होता. शेत मजुरीचे काम करून उदरनिर्वाह करीत होता. रविवार, 2 जुलै रोजी काही लोकांसोबत बाहेर पडल्यानंतर तो बेपत्ता झाला. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला परंतू शोध लागला नाही. नशिराबाद पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली. दुसरीकडे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघूर धरणाच्या पाटचारीत कुजलेल्या अवस्थेत अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळून आला. नशिराबाद आणि एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून चौकशी केली असता बेपत्ता झालेला राहूलचाच मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले.
एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला असता जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉ.सचिन पाटील यांनी एमआयडीसी पोलिसात दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास उपनिरीक्षक अनिस शेख करीत आहेत. दरम्यान, मयत राहुलच्या मृत्यू प्रकरणी एका संशयिताची चौकशी सुरू असल्याचे समजते.


